भुसावळ- शहरातील दिनदयाल नगराजवळ शनिवारी रात्री 10.30 वाजता पाच संशयीतांनी फायनान्स कर्मचार्यांना मारहाण करीत गावठी कट्ट्याचा धाक दाखवत त्यांच्याकडून सात हजार रूपयांची रोकड लांबवली होती. या प्रकरणी पोलिसांनी शोधमोहिम राबवत तिघांना अटक केली होती. आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता ओळख परेडसाठी पोलिस कोठडीचा हक्क राखून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
तिघेही कुविख्यात आरोपी
शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास मनिष रूपेश ठाकरे व त्याचा मित्र हे खाजगी फायनान्स कंपनीत कर्मचारी ते कर्ज वसुलीसाठी दिनदयाल नगरात गेले होते मात्र कर्जदार न मिळाल्याने ते परत येत असताना कुविख्यात तस्लीम उर्फ काल्या सलीम शेख, शेख वसीम शेख चाँद शेख व दीपक राजू पवार यांच्यासह पाच जणांनी दोघांना मारहाण करीत त्यांच्याजवळील पैसे हिसकावून धूम ठोकली होती तर बाजारपेठ पोलिसांनी रात्री उशिरा नाहाटा महाविद्यालय परीसरातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या तर आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी गावठी पिस्तूलासह दोन जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले होते. सोमवारी आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडीचा हक्क राखून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.