भुसावळात पुन्हा घरफोडी ; 92 हजारांचा ऐवज लंपास

0

पोलिसांच्या गस्तीला चोरट्यांचे आव्हान ; बंद घरे टार्गेट

भुसावळ:- शहरात जुन्या चोर्‍यांचा तपास थंड बस्त्यात असताना पोलिसांची गस्त भेदून चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट केल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. जामनेर रोडवरील बंब कॉलनीतील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी पुन्हा 92 हजारांची धाडसी घरफोडी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गत पंधरवड्यातच चोरट्यांनी तानी नगरातील श्री सप्तश्रृंगी मंदिरानजीकच्या मंदिरातील दानपेट्या फोडल्या होत्या तसेच त्याच्या दोन दिवसांनी गजानन महाराज नगरातील तीन घरांना टार्गेट करीत दिनारसह रोख रक्कम लांबवली होती. या चोर्‍यांचा तपास लागला नसतानाच पुन्हा घरफोडी झाल्याने पोलीस प्रशासनावरील दबाब वाढला आहे. विशेष म्हणजे वाढत्या चोर्‍यानंतर पोलिसांनी गस्त वाढवली असतनाही चोर्‍या होत असल्याने चोरटे माहितगार व पोलिसांच्या गस्तीवर लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे.

बंद घर फोडत 92 हजारांचा ऐवज लंपास
जामनेर रोडवरील बंब कॉलनीत किरण माणिक पारीसकर (46) राहतात. 17 ते 21 दरम्यान ते बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधत दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील तब्बल 80 हजारांच्या रोकडसह पाच ग्रॅमचे सोन्याचे मणि तसेच 80 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या तोरड्या मिळून एकूण 92 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारत चोरट्यांनी पोबारा केला. बुधवारी पहाटे चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवण्यात आली. पारीसस्कर यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ठसे तज्ज्ञांसह श्‍वान पथक दाखल
घरफोडीनंतर जळगाव येथील श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्‍वान पथकाचे हवालदार संदीप परदेशी व कॉन्स्टेबल मनोज पाटील यांच्या सोबत आलेल्या हॅपी नामक श्‍वानाने काही अंतरापर्यंतचा माग दाखवला तर ठसे तज्ज्ञ हवालदार साहेबराव चौधरी यांनी चोरट्यांचे ठसे टिपले. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत.

गुन्हेगारी वाढली, पोलीस प्रशासनात मरगळ
शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र सुरू असताना डिटेक्शन मात्र शून्य असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून क्राईम आलेख सातत्याने वाढत असताना गुन्हेगारांना धडकी भरेल, अशी कुठलीही ठोस कृती न झाल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. आरएफआयडी तंत्रज्ञानाने गस्त होवून चोर्‍यांना ब्रेक लागेल, असा आशावाद अधिकारी वर्तवत असलेतरी अनेक भागात गस्तच होत नसल्याने त्याचा फायदा चोरट्यांना होत आहे. पोलीस यंत्रणेने मरगळ झटकावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरीक व्यक्त करीत आहेत. पोलीस दलात आलेली एकूणच मरगळ पाहता वरीष्ठ अधिकार्‍यांनी या मागील कारणांचा शोध घ्यावा, असाही सूर उमटत आहे.