भुसावळात पैशांच्या वादातून चार वाहने जाळली ; दोघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- पैशांच्या वादातून शहरातील अकबर टॉकीज भागात अज्ञात दोघांनी इनोव्हा कारला पेटवून दिल्यानंतर आगीच्या झळांमुळे मारोती जिप्सीसह अन्य दोघे दुचाकीही जळाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिसात रेहान पटेल, दीपक परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात दोघांनी वाहने पेटवली
द्वारकानगरात किराणा व्यावसायीक ईलियासअली अब्बास अली यांचे रेहान पटेल, दीपक परदेशी यांच्याशी आर्थिक-देवाण घेवाणीतून वाद सुरू होते. त्यातच गुरूवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ईलियासअली यांच्या इनोव्हाजवळ झोपलेल्या अशोक चोपडे यांना दगडे मारून पिटाळल्यानंतर अज्ञात दोघांनी इनोव्हा कारला पेटवून दिले. पाहता-पाहता आग चांगलीच भडकल्याने शेजारीच उभ्या असलेल्या मारोती जीप्सी, स्कुटी व मोटरसायकलही जळाली. आगीमुळे परीसरात धावपळ उडाली तर ईलियासअली यांची बोअरींग सुरू करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग आटोक्यात आली नाही.

चार वाहने खाक
या अग्नितांडवात याच भागात भाडेकरू म्हणून राहात असलेले रवी चोटमल यांची स्कुटी (एम.एच.19 बी.ए.7918) जळाली तसेच इनोव्हा (एम.एच.31 सी.एन.2925), दुचाकी (एम.एच.19 सी.6773), जिप्सी (एम.एच.28 ए.6394) जळाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले.