भुसावळात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन : सहा संशयीत जाळ्यात

साकेगावातील हाणामारीप्रकरणी तिघांना अटक तर अंधारात अस्तित्व लपवून असलेल्या तिघांनाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भुसावळ : भुसावळसह नशिराबादमध्ये पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पथकांनी अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. साकेगाव येथील तिघांना हाणामारीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली तसेच अंधारात आपले अस्तित्व लपवून असलेल्या अन्य तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बेकायदा दारू विक्री प्रकरणी पोलिसांनी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल केले शिवाय रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर तसेच हद्दपार आरोपीदेखील तपासण्यात आले. या कारवाईने गुन्हेगारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी नऊ एनबीडब्ल्यू वॉरंटची तसेच 11 वॉरंटची यावेळी बजावणी केली तसेच 67 समन्सची बजावणी करून 21 विना क्रमांकाच्या वाहनावर कारवाई करीत सात वाहने जप्त करण्यात आली.

या अधिकार्‍यांच्या सहभागाने कोम्बिंग
शुक्रवारी रात्री आठ ते पहाटे तीनदरम्यान डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. भुसावळ शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाणे, तालुका पोलिस ठाणे, नशिराबाद पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी यात सहभागी झाले. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक पडघण, सहा. पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार तसेच नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मोरे यांच्यासह डीबी पथकातील कर्मचारी, आरसीपी प्लॉटून पोलिस आदींचा समावेश होता.

हद्दपार तसेच हिस्ट्रीशीटर तपासले
पोलिसांनी यावेळी नऊ एनबीडब्ल्यू वॉरंटची बजावणी केली तसेच 11 बीडब्ल्यू वॉरंटची बजावणी तसेच 67 समन्सची बजावणी केली. साकेगाव येथे झालेल्या हाणामारीप्रकरणी वॉण्टेड असलेल्या तीन आरोपींच्या प्रसंगी साकेगावातून मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींना भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भुसावळातील हुडको कॉलनी, मुस्लीम कॉलनी,जाम मोहल्ला, साकेगाव, दिनदयाल नगर, पांडुरंग टॉकीज परीसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेण्यात आला तसेच पोलिसांनी संबंधितांना वॉरंट, अटक वॉरंट, समन्सची बजावणी यावेळी केली.

सात वाहने पोलिसांकडून जप्त
पोलिसांनी सर्च ऑपरेशनमध्ये विना क्रमांकाच्या 21 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली तसेच सात वाहनांचे कागदपत्रे नसल्याने ही वाहने पडताळणीसाठी जप्त करण्यात आली 11 हद्दपार संशयीतांची तपासणी करण्यात आली मात्र एकही संशयीत घरी आढळला नाही. अवैध दारू विक्रीप्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले शिवाय गुन्हा जुगाराचा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या दप्तरी उपद्रवी म्हणून नोंद असलेल्यांचाही शोध यावेळी घेण्यात आला.

अंधारात अस्तित्व लपवून असलेल्या तिघांना अटक
शहरातील खडका रोडवरील पूलाच्याखाली दोन संशयीत शनिवारी पहाटे दोन वाजता लपून बसले असताना पोलिस वाहने आल्यानंतर संशयीत पळून जात असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. आमान शेख साजीद व रोहित करण बोरला (मुस्लीम कॉलनी, भुसावळ) अशी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहे. या प्रकरणी पोलिस परेश बिर्‍हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार मिलिंद कंक पुढील तपास करीत आहे. दरम्यान, बसस्थानकाच्या परिसरातील नवनाथ रसवंतीच्या बाजूला अंधारात घरफोडीच्या उद्देशाने लपलेल्या हसन अली नियाज अली (रा. इराणी मोहल्ला. भुसावळ) यालाही अटक करण्यात आली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. तुषार पाटील पुढील तपास करीत आहे.

एकाच्या घरातून तलवार जप्त
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी मुस्लीम कॉलनीत शेख अब्दुल कलीम यांच्या घराची झडती घेतली असत्या त्यांच्या घरात बेडरूममधील पलंगाखालून तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. विजय नेरकर पुढील तपास करीत आहे.