दोन जण जखमी, एकास अटक ; दुचाकी चारचाकीवर धडकल्याने वाद
भुसावळ- गतिरोधकावर चारचाकीवर दुचाकी आदळल्यानंतर शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचार्यासह तिघांना मारहाण करण्यात आली तसेच तीन हजार 500 रुपयांच्या रोकडसह 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लुटण्यात आल्याची घटना जळगाव रोडवरील भोईवाड्याजवळ 26 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयीत बाळू भोई यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
वाहनाला धक्का ; पोलिसावरच उचलला हात
तक्रारदार सौरभ मन्नालाल पाटील (25, पिळोदे खुर्द, ह.मु.मोरेश्वर नगर, भुसावळ) हे चारचाकी इनोव्हा (एम.एच.19 बी.यु.9060) ने जात असताना जळगाव रोडवरील भोईवाड्याजवळील गतिरोधकावर त्यांनी चारचाकीचा वेग कमी केल्यानंतर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या बाळू भोई यांच्या दुचाकीची चारचाकीला मागून जोरात धडक बसली. याबाबत सौरभ पाटील यांनी बाळू भोई यांना जाब विचारल्यानंतर शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने सौरभ यांनी बाजारपेठ पोलिसात नोकरीवर असलेले भाऊ उमाकांत मन्नालाल पाटील यांना मदतीसाठी बोलावले. उमाकांत यांनीही भोई यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र वाद विकोपाला गेल्यानंतर संशयीत आरोपी बाळू भोई यांच्यासह अशोक भोई (पूर्ण नाव माहित नाही) यांनी लाकडी दांडक्याने पोलिस कर्मचारी उमाकांत पाटील यांच्यासह तक्रारदार सौरभ पाटील व त्यांचा मित्र विशाल यांना मारहाण केली तसेच तीन हजार 500 रुपयांची रोकड व 12 हजारांचा मोबाईल लांबवला. या प्रकरणी 27 रोजी पहाटे शहर पोलिसात गुन्हा दाखल करून बाळू भोई यास अटक करण्यात आली. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के.टी.सुरळकर करीत आहेत.