भुसावळात पोलिस व पालिका प्रशासनाकडून विसर्जन मार्गाची पाहणी

0

सर्व विभागांनी विसर्जन मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करावे -देविदास पवार

भुसावळ- गणपती विसर्जन मिरवणूक वेळेवर व निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून सर्व विभागांनी आपल्या अधिकार कक्षेतील सर्व कामे वेळेवर पूर्ण करून मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करावे, असे आवाहन बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी केले. बुधवारी सकाळी नगरपरीषद, महावितरण, बीएसएनएल विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी श्री विसर्जन मार्गाची पाहणी केली. पाहणीनंतर पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांशी संवाद साधला. श्री विसर्जन मार्गात महावितरण व बीएसएनएल कंपनीच्या तारांचे अडथळे असून ते तातडीने दूर करावेत तसेच रस्त्यांवरील हातगाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने ती दूर करण्यात येणार आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने बंदोबस्त मागितल्यास तो तातडीने पुरविण्यात येईल, असेही ते म्हणाले. मिरवणुकीचा मार्ग जुनाच राहणार असून त्यात कुठलाही बदल केला जाणार नाही मात्र श्री विसर्जनाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल करण्यात येईल शिवाय अनेक ठिकाणचे रस्ते बॅरीगेटस् लावून बंद करण्यात येतील. शहरात शांतता टिकून राहण्यासाठी पोलिस विभागाचे प्रयत्न आहेत. व्यापार्‍यांसह हातगाडी धारकांनी स्वतःच आपली अतिक्रमणे काढून कटू कारवाई टाळावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यांनी केली श्री विसर्जन मार्गाची पाहणी
नायब तहसीलदार (महसूल) डी.पी.सपकाळे, उपमुख्याधिकारी श्रीपाद देशपांडे, महावितरणचे सहाय्यक अभियंता अनिमेष काळे, राहुल मराठे, बीएसएनएलचे जेटीओ ए.के.मिश्रा, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, नगरपरीषदेचे महेश चौधरी, वसंत राठोड, निवृत्ती पाटील, प्रदीप पवार, अशोक फालक, सुभाष नारखेडे, पी.डी.लोहार सतीश बेदरकर, तहसीलचे लिपिक नितीन तायडे, महावितरणचे कर्मचारी हिरासिंग चौधरी, प्रशांत चौधरी, बीएसएनएल कर्मचारी देविदास पाटील, लक्ष्मण पाटील,श्री.खान, पोलीस कर्मचारी छोटू वैद्य, बाळू पाटील, संजय भदाणे, नंदू सोनवणे आदी उपस्थित होते.