भुसावळात प्रतिबंधीत क्षेत्रात चोरीचा प्रयत्न ः नागरीकांनी एकास चोपले

0

भुसावळ- शहरातील प्रतिबंधीत असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरी परीसरातील लोकांच्या घरात घुसून चोरीचा प्रयत्न करणार्‍या एकास नागरीकांनी पकडून चांगलाच चोप देत शहर पोलीस ठाण्यात हजर केले. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. राजू जामसिंग पावरा (25, रा.झिरण्या, ता.खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु.रेल्वे स्थानक परीसर, भुसावळ) असे संशयीताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी संशयीताने आरपीडी रोडवरील प्रतिबंधीत ऑर्डनन्स फॅक्टरी परीसरात प्रवेश करून कर्मचार्‍यांच्या उघड्या घरात शिरून वस्तू लांबवण्याचा प्रयत्न केला. दोन ते तीन ठिकाणी संशयीताने चोरी करण्याचा प्रयत्नात महिला वर्गाने आरडा-ओरड केल्यानंतर संशयीतास ताब्यात घेवून नागरीकांनी चांगलेच चोपले. ऑर्डनन्स फॅक्टरीचे कनिष्ठ सुरक्षा रक्षक सैय्यद नसिरोद्दीन, दरबान राहुल पाटील यांनी संशयीतास शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. संशयीताविरुद्ध कुणी तक्रार न दिल्याने पोलिसांनी संशयीताविरुद्ध 109 प्रमाणे कारवाई करून त्यास तहसीलदारांसमक्ष हजर केल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली.