भुसावळ : मंगला एक्स्प्रेस रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी आऊटरला असताना प्रवाशाच्या हाताला काठीचा झटका मारून त्याचा मोबाईल लांबवण्यात आला होता. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. सागर उर्फ खडक्या संतोष ढोपा (22, रा.लोणारी हॉलमागे, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
6 जून रोजी रात्री 8.45 वाजता प्रवासी सलमान सलीम बागवान (भुसावळ) हे मंगला एक्स्प्रेसने चिपळून ते भुसावळ असा प्रवास करीत असताना मोबाईल वाजल्याने दरवाजात उभे राहून बोलत असतांना भुसावळ येथील आऊटरवर अज्ञाताने त्यांच्या हाताला काठी मारून मोबाईल पाडला व त्यामुळे बागवान सुध्दा खाली पडले. चोरट्याने जबरीने मोबाईल हिसकावत पळ काढला होता. लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सागर उर्फ खडक्या संतोष ढोपा (वय 22, रा. लोणारी हॉलमागे, भुसावळ) यास अटक करीत मोबाईल जप्त केला आहे. तपास उपनिरीक्षक संजय साळुंके करीत आहेत.