भुसावळ : भुसावळातील पंचशील नगर, मच्छी मार्केटमागील परीसरात बकरीने धक्का दिल्याने बालिका गटारीत पडल्यानंतर उफाळलेल्या वादानंतर चौघांनी एकास मारहाण केल्याची घटना 11 रोजी रात्री 10.30 वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चार जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा
फिर्यादी अरुण नामदेव तायडे (मच्छी मार्केट मार्गे, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी गटारीवर शौचास बसल्यानंतर बकरीने धक्का दिल्याने ती खाली पडली व त्यानंतर फिर्यादीने, गल्लीत बकर्या मोकळ्या सोडल्या जातात म्हणून बकरी मालकाला शिवीगाळ केल्यानंतर अनिस शकील पिंजारी याने शिवीगाळ न करण्याचे सांगितल्यानंतर तक्रारदाराने तुमची बकरी नसल्याने मध्ये न पडण्याचे सांगितल्याने संशयीत आरोपी बाबा शौकत पिंजारी, दानीश शकील पिंजारी, अनिस शकील पिंजारी, शाहरूख हारुण पिंजारी (सर्व रा.मच्छी मार्केट, भुसावळ) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपी बाबा शौकतने लाकडी दांडक्याने डोक्यावर मारून दुखापती केली तर अन्य आरोपींनी शिवीगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक दीपक अशोक जाधव करीत आहेत.