भुसावळात बाजारपेठच्या पोलिसाची ‘दबंगगिरी’ : आरोग्य कर्मचार्‍यास मारहाण

0

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या एका कर्मचार्‍याने दबंगगिरी करीत चक्क आरोग्य विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍याला झोडपून काढल्याची घटना सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिराजवळ घडली. या घटनेनंतर आरोग्य कर्मचार्‍यांनी पोलिसांच्या दबंगगिरीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. सिंधी कॉलनीत आरोग्य विभागाकडून सर्वे सुरू असून काम आटोपून हा कर्मचारी नगरपालिका दवाखान्यात जात असताना एका पोलिस कर्मचार्‍याने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

आरोग्य विभागाचे कर्मचारी संतप्त
आयसीटीसी कॉन्सीलर दीपक शेलार हे सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास आपल्या सहकार्‍यांसोबत सिंधी कॉलनीतील काम आटोपून नगरपालिका दवाखान्यात येत असताना अष्टभूजा मंदिराजवळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या एका कर्मचार्‍याने त्यांना हातावर तसेच पाठीमागील भागात काठीने जबर मारहाण केली. संबंधित कर्मचार्‍याने आपण आरोग्य विभागाचा कर्मचारी असल्याचे सांगूनही ओळखपत्र दाखवले मात्र संबंधित कर्मचार्‍याने काहीही ऐकून न घेता उलट संबंधित कर्मचार्‍यालाच उपदेशाचे डोस पाजत आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

अधिकार्‍यांकडे कर्मचार्‍यांनी केली तक्रार
मारहाणीत कर्मचार्‍याचा हात मुरगळल्याने त्याला तातडीने खाजगी दवाखान्यात उपचारार्थ हलवण्यात आले तर या गंभीर प्रकाराबाबत प्रांताधिकारी, डीवायएसपी गजानन राठोड तसेच बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना डॉ.किर्ती फलटणकर यांनी फोनवरून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान, निरीक्षक भागवत यांच्याशी संपर्क साधला असता डॉ.फलटणकर यांनी झालेल्या प्रकाराची माहिती दिली असल्याचे सांगून या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमानुष मारहाण चुकीचीच : डॉ.किर्ती फलटणकर
आरोग्य विभाग हा देखील अत्यावश्यक सेवेत काम करत आहे, आरोग्य विभागाचे ओळखपत्र दाखवूनही पोलिसांकडून बळाचा उपयोग करणे हे कितपत योग्य आहे? झालेली मारहाण अयोग्य असल्याचे नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी सांगितले.

कारवाईकडे लागले लक्ष
लॉकडाऊनचे उल्लंघण केले म्हणून शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी सर्वसामान्यांना कायदा दाखवल्यास त्यास कुणी विरोध करणार नाही मात्र अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍याला अमानुषपणे मारहाण झाल्याने दोषीवर कारवाई होत नाही तो पर्यंत मंगळवारपासून या भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी काम न करण्याच्या पावित्र्यात आहेत. नागरीकांना शिस्तीचे डोस पाजणारा हा विभाग आपल्या कर्मचार्‍यावर आता काय कारवाई करतो? याकडे सर्वसामान्य भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.