भुसावळ : जिल्ह्यात बायोडिझेलचा काळाबाजार सुरू असल्याने या संदर्भात कारवाईचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेने भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीतील दीपनगरजवळ बायोडिझेलची अवैधरीत्या विक्री करताना तिघा संशयीतांना रंगेहाथ पकडत तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने बायोडिझेलची अवैध विक्री करणार्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. पंप चालक हितेश वासुदेव शर्मा (24, रा.वरणगाव, ता.भुसावळ), सिकंदर खान इस्माईल खान (50, मिल्लतनगर, भुसावळ) व शेख निसार शेख (19, वरणगाव, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संशयीतांविरोधात प्रभारी पुरवठा निरीक्षक विजय पुंडलिक पाटील यांच्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अटकेतील आरोपींना भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मध्यरात्री पोलिसांची धाड
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार, 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास वरणगाव महामार्गावरील हॉटेल निर्मल ढाब्याजवळ अवैधरीत्या सुरू असलेल्या बायोडिझेल पंपावर छापा टाकल्यानंतर खळबळ उडाली. पथकाने महेंद्रा कंपनीचे वाहन (जी.जे.11 एक्स.9660), एक लाख 68 हजारांचे दोन हजार लीटर बायोडिझेल, 40 हजार रुपये किंमतीचे दोन डिस्पेन्सर मशीन, 16 हजार रुपये किंमतीची मोटार, केबल वायर तसेच एक लाख 93 हजारांची रोकड मिळून सात लाख 37 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक रणजीत जाधव, किशोर राठोड, कॉन्स्टेबल श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील तसेच भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी विठ्ठल फुसे, प्रेम सपकाळे, संजीव मेढे आदींच्या पथकाने केली.