भुसावळ : शहरात जुन्या चोर्यांचा तपास लागत नसताना नव्याने होणार्या चोर्या, घरफोड्यांमुळे रहिवासी धास्तावले आहेत. शहरातील स्वामी नारायण मंदिराजवळील ब्रह्मव्हेरीटेज अपार्टमेंटमधील रहिवासी सविता सहजे या दुपारी श्री क्षेत्र शिरसाळा येथे दर्शनासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी घरात प्रवेश करीत सव्वा लाखांची रोकड व दागिने मिळून दोन लाख 58 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना शनिवारी भर दिवसा दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भर दिवसा चोरीने खळबळ
सविता सहजे या शहरातील जामनेर रोडवरील स्वामी नारायण मंदिराजवळील ब्रह्मव्हेरीटेज अपार्टमेंटमध्ये राहतात. शनिवारी दुपारी त्या श्री क्षेत्र शिरसाळा येथे मंदिरात गेल्याने घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश करत सोन्याचे दागिणे व सव्वा लाखांची रोकड मिळून एकूण दोन लाख 58 हजारांचा ऐवज लांबवला. सहजे यांनी मुलीच्या बाळंतपणासाठी सुमारे सव्वा लाखांची रोकड जमवून ठेवली होती. यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी रात्रीच जळगाव येथून श्वान पथकाला पाचारण केले. अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.