भुसावळात भरदिवसा बारावीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

भुसावळ : बारावीच्या विद्यार्थ्यावर भर दिवसा चाकूहल्ला झाल्याची घटना शहरात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर संशयीत पसार झाले असून बाजारपेठ पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला. संशयीतांच्या हल्ल्यात आदित्य कैलास सावकारे (१८) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हल्ल्याची घटना घडली. दरम्यान, शहरात बुधवारी रात्री दिनदयाल नगरात चाकू हल्ला झाल्याची घटना ताजी असताना व या घटनेला ३६ तास उलटत नाही तोपर्यत दुसरा चाकू हल्ला शहरात झाल्याने खळबळ उडाली आहे.

वादाची खुन्नस काढण्यासाठी हल्ला
शहरातील नाहाटा महाविद्यालयातील बारावीतील विद्यार्थी आदित्य कैलास सावकारे (१८) याचा काही मित्रांमध्ये गेल्या महिन्यात गैरसमजातून वाद झाल्यासने या वादाची खुन्नस काढण्यासाठी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील हिमालया पेट्रोल पंपासमोर सावकारे याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा युवकांनी अचानक हल्ला चढवला. सावकारे याच्या छातीवर तसेच डोके, हात व पाठीवर सुध्दा चाकूने सपासप वार करण्यात आले तसेच रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.
जखमी विद्यार्थ्याला तत्काळ ट्रामा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आल्यानंतर डॉ. मयुर चौधरी यांनी उपचार केले.

पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी
चाकू हल्ल्याची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, निलेश चौधरी, तुषार पाटील, योगेश माळी, प्रशांत परदेशी, दीपक पाटील, सचिन चौधरी, मिलिंद कंक, अतुल कुमावत, कैलास ठाकूर आदींनी धाव घेतली. दरम्यान, जखमीच्या जवाबानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.