भुसावळ- भरधाव चारचाकी अॅपे रीक्षावर धडकून झालेल्या अपघातात जामनेर तालुक्यातील गाडेगावच्या अॅपे चालकासह सहा जण जखमी झाल्याची घटना जामनेर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर पळून जाणार्या चारचाकी चालक योगेश चौधरी यास जमावाने ताब्यात घेत बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. शहरातील चिकुच्या मळ्यातील रहिवासी सुरेश ज्ञानदेव वारके यांच्या आई शोभाबाई वारके यांचे निधन झाल्याने त्यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमानिमित्त सोमवारी गाळेगावच्या श्रीराम भजनी मंडळाचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कीर्तन आटोपल्यानंतर भजनी मंडळी अॅपे रीक्षा (एम.एच.19 ए.एक्स.4846) ने गावाकडे निघाले असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेली चारचाकी महिंद्रा टीयुव्ही (एम.एच.19 सी.व्ही.5505) ने धडक दिल्याने अॅपे चालक कैलास पाटील (40), पांडुरंग लोखंडे (50), रवींद्र भारंबे (40) व जगदेव भारंबे (45), संजय भारंबे, दीपक वारके हे सहा जण जखमी झाले. जखमींना सुरुवातीला जामनेर रोडवरील सोनिच्छावाडी रुग्णालयात हलवल्यानंतर अधिक उपचारार्थ गोदावरीत हलवण्यात आले. जखमींपैकी भारंबे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयुमध्ये हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जखमींना हलवण्याकामी आकाश कोळी, हरेश सूर्यवंशी, अक्षय पवार, दिलीप बोदडे, रोहित महाले, शेखर पाटील, सुरेश वारके, अनिल पाटील, प्रवीण वडसकर, किरण मिस्त्री यांनी सहकार्य केले.