भुसावळात भाजपा पाणीपुरवठा सभापतींची दबंगगिरी ; विद्युत पर्यवेक्षकास ट्रकखाली चिरडण्याची धमकी

0

धमकी व शिविगाळचा पालिका कर्मचार्‍यांकडून निषेध ; राजेंद्र नाटकरांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

भुसावळ- पालिकेतील भाजपाचे पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर यांच्या प्रभागातील काम न केल्याने संतप्त झालेल्या नाटकर यांनी पालिकेच्या विद्युत पर्यवेक्षक सुरज युवराज नारखेडे यांना मोबाईलवरून शिविगाळ करीत ट्रकखाली चिरडण्याची धमकी दिल्याची घटना 5 रोजी सकाळी 9.33 वाजता घडली. या घटनेचा पालिका कर्मचार्‍यांनी निषेध केला असून शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली तसेच नाटकरांनी दिलेल्या धमकीच्या संभाषणाची क्लीपही पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेने पालिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

धमकीच्या संभाषणाची दिली पोलिसांना सीडी
सुरज नारखेडे यांनी शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, जनआधारच्या नगरसेविका व माजी नगरसेविका ललित मराठे यांच्या पत्नी वैशाली चावदस पाटील यांच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये पथदिवे बंद असल्याने सातत्याने त्यांच्याकडून तक्रारी येत असल्याने 4 रोजी या प्रभागात विद्युत कामांसाठी पालिकेचे कर्मचारी पाठवले होते व माहिती प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक व पाणीपुरवठा सभापती नाटकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भ्रमणध्वनीवर 5 रोजी सकाळी दूरध्वनी करून कामांबाबत विचारणा केली. आपण त्यांना तक्रारी आल्यानंतर तेथे कर्मचारी पाठवल्याचे सांगितल्याने आपल्या प्रभागात कर्मचारी पाठवल्यास तुझे हात-पाय मोडून टाकीन, तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. शिवाय तुम्ही चिनावलला राहतात मी ट्रकखाली तुम्हाला चिरडेल, तुमचा हात-पाय तुटला तर मला बोलू नका, अशी धमकी दिल्याचेही पोलिसांना दिलेल्या सीडीतील संभाषणातून स्पष्ट झाले आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर अधीक्षक अख्तर खान, गणेश लाड, सचिन नारखेडे, रवींद्र वसंत पाठक, निर्मल वाणी, विपुल चांदेकर, श्यामलाल गिरी, परवेज अहमद, एकराज गिरी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले, किरकोळ वाद
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, दोघांमध्ये किरकोळ वाद होता व तो आता मिटला आहे.

आरोप निराधार, कुणाचीही माफि मागण्याचा प्रश्‍नच नाही
नगरसेवक राजेंद्र नाटकर म्हणाले की, आपण कुणालाही शिविगाळ केलेली नाही, आपल्यावरील आरोपात तथ्य नाही तसेच आपण कुणाचीही माफि मागितलेली नसल्याचे ते म्हणाले.

मुख्याधिकार्‍यांच्या भूमिकेने आश्‍चर्य
पालिकेच्या शासकीय कर्मचार्‍याला नगरसेवकाकडून थेट ट्रकखाली चिरडण्याची उघड धमकी दिली जात असताना पालिकेचे प्रमुख असलेले मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी घेतलेली समेटाच्या भूमिकेने पालिका कर्मचार्‍यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला असला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांची भूमिका कळू शकली नाही.