भुसावळात भुरट्या चोर्‍यांचा उच्छाद ; तीन दुकाने फोडली

0

नुकसानीनंतर गुन्हा दाखल करण्यास शहर पोलिसांकडून डोळेझाक ; अल्पवयीन चोरट्यांकडून चोर्‍या झाल्याची शक्यता

भुसावळ- शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र कायम असून जुन्या गुन्ह्यांची उकल होत नसतानाच सातत्याने होणार्‍या चोर्‍यांमुळे नागरीकांमध्ये भीती निर्माण झाली आहे तर पोलिस प्रशासन मात्र चोर्‍या रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरीष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेणे गरजेचे असल्याचा सूर सर्वसामान्य नागरीकांमधून उमटत आहे. शहरातील वसंत टॉकीजमागील मेथाजी मळा भागात डेअरीसह तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्याने या भागात खळबळ उडाली. चोरीला मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल गेला नसलातरी भर वस्तीतील चोर्‍यांमुळे नागरीकांमध्ये मात्र भीती पसरली आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली असलीतरी गुन्हा मात्र दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.

एकाच भागातील तीन दुकाने फोडली
वसंत टॉकीजमागील मेथाजी मळा भागात सुनील निवृत्ती पाटील यांची रेणुका डेअरी असून चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत सामानाची फेकाफेक केली तसेच रोकड न मिळाल्याने चोरट्यांनी चिलर फ्रिजचे नुकसान करीत कॉपर पाईप चोरून नेल्याचे पाटील म्हणाले. या प्रकारात सुमारे 30 हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. डेअरीच्या पाठीमागे असलेल्या गोकुळ हरी सरोदे यांच्या सरोदे डिझेल सर्व्हिस या दुकानाची पत्र्याची जाळी कापून चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातून सुमारे 700 रुपयांची रोकडसह चिल्लर लांबवली तसेच सामानाची फेकाफेक केली. विशेष म्हणजे, सरोदे यांच्याकडे दोन महिन्यात तिसर्‍यांदा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे तर सरोदे यांच्या शेजारी स्टॅम्प वेंडर नाना प्रताप शिंदे यांचे कार्यालय असून तेथेही चोरीचा प्रयत्न झाला मात्र काहीही गेले नसल्याचे शिंदे म्हणाले.

घटनास्थळी आढळली लोखंडी टॉमी
एकाच रांगेत असलेल्या तीनही दुकानांबाहेर पोलिसांना लोखंडी टॉमी आढळल्यानंतर पोलिसांनी ती जप्त केल्याचे दुकानदार म्हणाले. शहर पोलिस ठाण्याचे एएसआय नामदेव चौधरी यांनी दुकानदारांची भेट घेत माहिती जाणून घेतली. तीनही दुकानांमध्ये चोरी करणारे चोर अल्पवयीन असल्याचा संशय आहे. सरोदे यांच्या दुकानाच्या दरवाजावर लावलेल्या अवघ्या एका फुटाच्या जाळीतून केवळ अल्पवयीन शिरू शकत असल्याने भुरट्या चोरांनी ही चोरी केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.