सेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन ; त्वरीत कारवाईचे शिष्टमंडळाला आश्वासन
भुसावळ- दिवाळी उत्सवास सुरुवात झाल्यानंतर शहरातील मिठाई तसेच खवा विक्री करणार्या दुकानांसह खाद्यतेल व डालडा तुपाची विक्री करणार्या दुकानांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात न आल्याने शिवसेना पदाधिकार्यांनी आश्चर्य व्यक्त करीत तातडीने खाद्यपदार्थांची विक्री करणार्या दुकानांची तपासणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. संबंधित विभागाला तातडीने कार्यवाईचे आदेश देण्यात येतील, असे आश्वासन प्रांताधिकार्यांनी शिष्टमंडळाला दिले.
अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेबाबत आश्चर्य
दिवाळीच्या काळात सर्वात खाद्यतेलासह मिठाई आदी पदार्थात भेसळ केली जात असते असे असताना अन्न व औषध प्रशासनाकडून शहरात तपासणी मोहिम राबवण्यात का आली नाही? असा प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केला. भेसळयुक्त खाद्य पदार्थांची तपासणी करण्याची मोहीम सुरू करावी व त्याबाबत तातडीने आदेश देण्यात यावे, अशी मागणी प्रांतांकडे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या तपासणीत दोषी आढळून आल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये कारवाई केली जावी व प्रसंगी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील यांनी केली.
कामाचा ताण असल्याचे संबंधित विभागाकडून कारणे
अन्न व औषध प्रशासनमध्ये सध्या मनुष्यबळाची टंचाई निर्माण झाली आहे. फुड इन्स्पेक्टर (अन्न निरीक्षक) कमी आहेत, अधिकार्यांवरही अतिरिक्त कामाचा ताण आहे. त्यामुळे कामे करण्यात अडचणी येत आहेत, अशी कारणे या विभागातर्फे देण्यात आली असल्याचे शिष्टमंडळाने प्रांतांना सांगितले.
तर ‘हरामखोर’ अशी पाटी लावणार
दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, मावा, परराज्यातून येणारी स्पेशल बर्फी, खाद्यतेल, फरसाण, शेव या पदार्थांची तपासणी मोठ्या प्रमाणावर करावी, भेसळ करणारा, नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा व्यापारी निदर्शनास आल्यास कायद्यापलीकडे जाऊन शिवसेना स्टाईलने ‘हरामखोर’ अशी पाटी दुकानावर लावून आंदोलन केले जाईल, असा इशारा महिला आघाडीतर्फे भुराबाई चव्हाण यांनी आक्रमक भूमिका मांडताना दिला.
इमानदार व्यापार्यांच्या पाठीशी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष
भेसळ न करणार्या, इमानदारीने व्यापार करणार्या सर्व व्यापार्यांच्या पाठीशी शिवसेनेचा ग्राहक संरक्षण कक्ष पाठीशी आहे. व्यापार्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्यांनी जिल्हा प्रमुख गजानन मालपुरे, उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख, तालुका प्रमुख देवेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यांची होती निवेदन देताना उपस्थिती
प्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख, तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, ग्राहक संरक्षण शहरप्रमुख मनोज पवार, शिक्षकसेना जिल्हाअध्यक्ष प्राचार्य विनोद गायकवाड, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका पुनम बर्हाटे, शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहर प्रमुख बबलू बर्हाटे, निलेश महाजन, महिला आघाडी शहर संघटिका भुराबाई चव्हाण, शहर संघटक योगेश बागुल, उपशहर संघटक राकेश चौधरी, तालुका युवा अधिकारी हेमंत बर्हाटे, शहर युवा अधिकारी सुरज पाटील, शेखर तडवी, विक्की चव्हाण उपस्थित होते.