भुसावळात मालगाडीच्या धक्क्याने चाबीमनचा मृत्यू

0

भुसावळ- शहरातील रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण केंद्राजवळील (झेडटीआरआय) कॉर्डलाईनजवळ जाणार्‍या मालगाडीखाली आल्याने चाबीमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 11.55 वाजेच्या सुमारास घडली. धुन्नी बद्रीला (47, लिंम्पस क्लब, रेल्वे क्वार्टर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळवूनही दुपारी दिड वाजेपर्यंत लोहमार्ग पोलिस न पोहोचल्याने मृतदेह रूळावरच पडून असल्याने लोहमार्ग पोलिसांच्या असंवेदनशीलतेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. बद्रीला हे झेडटीसी गेट क्रमांक एक जवळील कॉर्ड लाईनवर आपली ड्युटी करीत असताना मालगाडी आल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रेल्वे कर्मचारी ट्रॅक मेंटनर असोसिएशन भुसावळ विभागाने रेल्वे कर्मचार्‍यांच्या पत्नीस 24 तासात सर्व रेल्वेचे लाभ देण्यासह तत्काळ नोकरी देण्याची मागणी केली आहे.