सतर्कतेने वेळीच आगीवर नियंत्रण ; अति तापमानाने लागली आग
भुसावळ:– शहरातील काशीनाथ लॉजमागील रहिवासी भरत मेहता यांच्या जागेत असलेल्या रिलायन्स या खाजगी मोबाईल कंपनीच्या जनरेटरला बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आग लागल्याने नागरीकांची धावपळ उडाली. अति तापमानामुळे वायरींनी पेट घेतल्याने जनरेटरनेही पेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. आगीची माहिती भुसावळ अग्निशमन दलाला कळवण्यात आल्यानंतर यंत्रणेने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. याप्रसंगी सतर्कता म्हणून या भागातील वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला.
अति उष्णतेने आग लागल्याचा संशय
मेहता यांच्या जागेत रीलायन्स या खाजगी कंपनीने टॉवर उभारला असून सकाळी अति उष्णता वाढल्याने केबल वायरींनी पेट घेतल्याने जनरेटरपर्यंत आग पोहोचल्याचा संशय आहे. आगीनंतर या भागात नागरीकांची मोठी धावपळ उडाली. भुसावळ अग्निशमन विभागाचे चालक कैलास कोळेकर, डिगंबर येवले, रवींद्र पाटील यांनी वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले तसेच या परीसरातील राजीव जैन, प्रदीप शाह, मनीष कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी आदींनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, आगीचे नेमके कारण कळू शकले नाही तर रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसातही याबाबत नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.