भुसावळात रस्ते टाकणार कात

0

भुसावळ पालिकेच्या विशेष सभेत ‘रस्ता कामाच्या‘ विषयाला सत्ताधारी नगरसेवक दिली मंजुरी

भुसावळ : शहरातील वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत कॉलनी भागातील रस्त्यांची अमृत योजनेच्या पाईप लाईनमुळे दुरवस्था झाल्याने आमदार, नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाविषयी प्रचंड रोष वाढला होता. महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळात आलेल्या मुख्यमंत्र्यांकडे आमदारांनी रस्ते कामांसाठी विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मक दर्शवल्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शुक्रवारी पालिका सभागृहात विशेष सभा घेण्यात आली व त्यात शहरातील 1 ते 24 प्रभागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाला मंजुरी देण्यातआली. पीठासन अधिकारी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा शेख सईदा शफी व गटनेता मुन्ना तेली उपस्थित होते. दरम्यान, या सभेकडे जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी पाठ फिरवली.

विरोधी बाकावर बसले सत्ताधारी
जनआधारचे विरोधी नगरसेवक सभागृहात न आल्याने विरोधकांच्या बाकावर सत्ताधारी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, पिंटू कोठारी, अमोल इंगळे, चंद्रशेखर अत्तरदे, लक्ष्मी मकासरे यांनी बसत सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधले. सभा संपल्यानंतर नगरसेविका पुष्पा सोनवणे सभागृहात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करीत सभागृहाबाहेर पाय ठेवला.

रस्त्यांचा त्रास सर्वांनाच -नगराध्यक्षांची कबुली
खराब रस्त्यांचा त्रास सर्वांनाच होत असल्याची प्रथमच कबुली नगराध्यक्षांनी दिली. ते म्हणाले की, शहरातील 1 ते 24 प्रभागातील रस्त्यांची कामे होणार असून कोणताही भाग, वॉर्ड सुटणार नाही याची काळजी घेतली जात आहे. महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामांची बैठक असताना विरोधी नगरसेवकांनी पाठ फिरवणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. यापुढे सभागृहाने सर्व विकासाच्या विषयांना एकमुखाने मंजुरी द्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्ताधारी गटनेत्यांनी सुचवली सुधारणा
सभेत गटनेता मुन्ना तेली यांनी शहरातील झोपडपट्टी तसेच स्लम भागात रोलर वा डंपर जावून डांबरीकरण शक्य नसल्याने अशा ठिकाणी आयपीएस वा पेव्हर ब्लॉक बसवण्याची सूचना मांडली, त्यास सभागृहाने अनुमोदन दिले. नगरसेवक व सी.ए.प्रा.दिनेश राठी यांनी रस्ता कामांचे काम करताना अर्टी व शर्तींचा भंग होणार नाही याची काळजी घेवून कामे व्हावीत, अशी अपेक्षा करीत सी.एम.यांनी शब्द दिला असलातरी आधी लेखी घेण्याची सूचना मांडली. नगरसेवक युवराज लोणारी, सोनल महाजन, पिंटू कोठारी यांनी अमृतच्या पाईप लाईन खोदण्यात आल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने डांबरीकरणापूर्वी पाईप लाईनची कामे पूर्ण करण्याची सूचना केली तसेच एलईडी ठेकेदाराबाबतही तक्रारी केल्या.

मग आरोग्य निरीक्षक कसला पगार घेतात?
शहरातील कचर्‍यासंदर्भात आरोग्य निरीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर ते आकाश कल्याण फाऊंडेशनने बोलण्याचा सल्ला देतात, अशी तक्रार नगरसेवक किरण कोलते यांनी केल्यानंतर नगराध्यक्षांनी संतप्त होत नागरीक वा नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीचे निरसन करणे आरोग्य निरीक्षकाचे काम असल्याचे सांगून ते मग कसला पगार घेतात? असा प्रश्‍न नगराध्यक्षांनी उपस्थित केला. आरोग्य निरीक्षकांवर कारवाई करण्यााबाबत चर्चा मुख्याधिकार्‍यांकडे करू, असे आश्‍वासन त्यांनी सभागृहाला देत एलईडी ठेकेदाराबाबतही तक्रारी वाढल्याचे सांगत संबंधितावरही कारवाईचे संकेत दिले.

बाप्पांचे आगमन मात्र खडतर मार्गातून
16 कोटींच्या विशेष रस्ता अनुदानातून शहरातील रस्त्यांची कामे होणार असलीतरी विघ्नहर्त्या गणरायाचे अवघ्या तीन दिवसांवर आगमन होणार असलेतरी शहरातील रस्त्यांची किमान डागडूजीदेखील झाली नसल्याने बाप्पांचे आगमन मात्र खडतर मार्गातून होणार असल्याने गणेश भक्तातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील सर्वच रस्त्यांची नव्हे आवश्यकतेनुसार रस्त्यांची कामे होतील, असे नगराध्यक्षांनी सांगत डागडूजी संदर्भात मुख्याधिकार्‍यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले.