भुसावळात रेल्वेच्या आरओएच डेपोतील गवताला आग

0

भुसावळ- शहरातील रेल्वेच्या आरओएच डेपोबाहेरील गवताला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. आगीत काहीही नुकसान झाले नसलेतरी यंत्रणेचे मात्र आग विझवण्यासाठी धावपळ उडाली. आग विझविण्यासाठी येथील आयुध निर्माणीच्या फायर फायटर विभागाला माहिती देताच काही वेळातच बंब घटनास्थळी दाखल झाला. बंबावरील कर्मचार्‍यांनी अर्ध्यातासात आग आटोक्यात आणली. रात्री हवा सुटली असल्याने आग कोरडा कचरा व कोरडे गवत तात्काळ पेट घेत होते. हवेमुळे आग फैलत असल्याने आग मोठ्या प्रमाणावर फैलू नये यासाठी कर्मचार्‍यांनी धावपळ करीत आग आटोक्यात आणली.

कर्मचार्‍यांची आग विझवण्यासाठी धावपळ
रेल्वेच्या आरओएच डेपोत मालगाड्यांच्या ट्रॉलीचे काम केले जाते. आरओएच डेपोच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत आरओएच डेपोतील भंगार साहित्य ठेवण्यात आले या परीसरातील मोठ्या प्रमाणावरील गवताला शुक्रवारीी रात्री अचानक आग लागली. याचवेळी हवेचा वेग अधिक असल्याने आग लागलीच पसरली. आगीमुळे आरओएच डेपातील कर्मचार्‍यांमध्ये एकच धावपळ उडाली. यावेळी रात्र पाळीवर असलेल्या सुमारे 25 ते 30 कर्मचार्‍यांनी आगीबाबत वरीष्ठांना माहिती कळवताच डेपोतील सिनीअर सेक्शन इंजीनियर ए.के.डे यांनी तात्काळ डेपो गाठला. आयुध निर्माणीचा बंब येतो तोपर्यत कर्मचार्‍यांनी मिळेल त्याच्याने पाणी मारण्याचा व मातीचा मारा करून आग विझविण्याच प्रयत्न केला.