भुसावळ : राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनाव्दारे सर्व परवानाधारकांना 440 रुपये प्रती प्रतीक्विंटल कमीशन व 50 हजार रुपये मानधन द्यावे, गहू व तांदुळ व्यतिरिक्त खाद्यतेल व डाळींचा दरमहा पुरवठा करावा, कोरोना महामारित बळी गेलेल्या रेशन दुकानदारांना मदत द्यावी आदींसह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले.
या मागण्यांसाठी धरणे आंदोलन
एलपीजी गॅसच्या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांना दुकानांतर्गत रेशन कार्डवर सिलेंडरची विक्री, नोंदणी करण्याची परवानगी देवून कमीशन ठरविण्यात यावे, धान्य प्लास्टीक गोण्यांमध्ये देणे बंद करुन ज्यूटच्या गोण्यांचा वापर करावा, केंद्र शासनाने वाढविलेले 20 व 37 रुपये कमीशन रक्कम सर्व राज्य सरकारांनी तत्काळ लागू करावी, देशभरात ग्रामिण क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदारांना डायरेक्ट प्रोक्रुमेंट एजंट म्हणजे सरकारव्दारा गहू, तांदूळ व भरडधान्य खरेदी करण्याची परवानगी द्यावी आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालावर धरणे आंदोलन करण्यात आले. 11 जूलैला सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, 18 जूलैला मुंबईत तर यानंतर मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑगस्टला दिल्लीत संसदेला घेराव आंदोलन करण्याचा इशारा यावेळी तहसीलदारांना देण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील, जिल्हा सचिव सुनील अंभोरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख कैलास उपाध्याय, तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, शहराध्यक्ष आरिफ मिर्झा, तालुका उपाध्यक्ष सी.आर. पाटील, उल्हास भारसके, राजेश सैनी, इश्वर पवार, नारायण वाणी आदी उपस्थित होते.