भुसावळात रोडरोमिओंवर पोलिसांची कारवाई

0

पहिल्या दिवशी तिघा टारगटांवर पोलिसांची कारवाई : नागरीकांच्या तक्रारीनंतर भुसावळात पोलिस दलाला आली जाग

भुसावळ : शहरातील वाढत्या गुन्हेगारीसह रोमिओगिरीविरोधात भुसावळातील शांतता समितीच्या बैठकीत नागरीकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांपुढे पाढा वाचल्यानंतर कारवाईचे आश्‍वासन पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर प्रत्यक्षात कारवाईला मंगळवारपासून सुुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवाजी नगरात डी.एल.हिंदी विद्यालयाच्या आवारातून तिघा अल्पवयीन तरुणांना दुचाकीसह ताब्यात घेण्यात आल्याने टारगटांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. या कारवाईचे शहरातील पालकांसह तरुणींनी स्वागत केले असून कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तक्रारीच्या रेट्यानंतर पोलिस दलाला जाग
दोन दिवसांपूर्वी शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत सुज्ञ नागरीकांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीसह शाळा-महाविद्यालयाच्या आवारात तसेच क्लासेसबाहेर रोडरोमिओंचा उच्छाद सुरू असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यासह छेडखानी रोखण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती करणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारपासून पोलिसांकडून प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात करण्यात आली.

पहिल्या दिवशी तिघांवर करवाई
पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक रावसाहेब किर्तीकर, श्रीकृष्ण देशमुख, ईश्‍वर भालेराव, प्रशांत चव्हाण, विकास सातदिवे, रमण सुरळकर, अय्याज सैय्यद आदींनी शहरातील शिवाजी नगर भागातील डी.एल.हिंदी विद्यालयाच्या आवारातून तिघांना ताब्यात घेतले तर पु.ओ.नाहाटा महाविद्यालय, दे.ना.भोळे महाविद्यालय, के.नारखेडे, एन.के.नारखेडे विद्यालयाच्या आवारात जावून रोडरोमिओंचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. अचानक आलेले पोलिस पाहून रोडरोमिओंना पळता भुई थोडी झाली. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तिघा टारगटांच्या पाल्यांना बोलावून पोलिसांनी कडक शब्दात समज दिली. या तरुणांच्या दोन वाहनांपैकी एका वाहनावर क्रमांक नसल्याने कारवाईचे आदेश देण्यात आले.