भुसावळात लॉकडाऊनची संधी साधून वाढतेय अतिक्रमण

0

भुसावळ : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा लढत असल्याची संधी साधून शहरात काहींनी अतिक्रमण करण्याचा प्रकार सुरू केल्याने आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे. शहरातील मॉडर्न रोडवरील मोठ्या पोस्ट कार्यालयाजवळ काहींनी रात्रीत टपरी उभी करून ती वर्दळीच्या रस्त्यावर आणल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. शहराच्या चौफेर आधीच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असताना नव्याने रात्रीमध्ये रस्त्यांवर टपर्‍या ठेवल्या जात असल्याने पालिका प्रशासनाने अतिक्रमण करणार्‍यांवर गुन्हे दाखल करून हे साहित्य जप्त करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कारवाईचे आदेश – मुख्याधिकारी
मोठ्या पोस्ट कार्यालयाजवळ रस्त्यावर टपरी ठेवण्यात आल्याची तक्रार आपल्याला प्राप्त झाली असून पालिकेचे अधिकारी पंकज पन्हाळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी दिली.

मॉडर्न रोडवरील दुकानाबाहेरील जाळ्या लांबवल्या
अतिक्रमणाची डोकेदुखी वाढत असतानाच मॉडर्न रोड व स्टेशनरोड परीसरात भुरट्या चोर्‍यांचा उपद्रव वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी सुरू असल्याने मॉडर्न रोड, स्टेशन रोडसह शहरातील दुकाने बंद असल्याने काही चोरटे गटारींवर ठेवलेल्या लोखंडी जाळ्यादेखील लांबवल्याने व्यापारी, दुकानदार त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.