भुसावळ : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी.ची चाकेही थांबली मात्र 22 मे पासून रेडमध्येदेखील काही ठिकाणी जिल्हांतर्गत प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर भुसावळ आगारातून शुक्रवारी बोदवडसह वरणगाव, रावेर, जामनेरसाठी एकूस 32 फेर्याचे नियोजन असलेतरी पुरेशी जनजागृती व प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी दुपारी पाच वाजेपर्यंत सहा बसेसच्या माध्यमातून केवळ 12 फेर्या झाल्या. त्यातही प्रवासी नसल्याने रीकामीच बस धावल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असेच काहीसे चित्र दिसून आले.
दोन महिन्यात भुसावळ आगाराला मोठा आर्थिक फटका
भुसावळ आगाराकडे एकूण 52 बसेस असून या माध्यमातून दररोज 18 हजार किलोमीटर एस.टी. धावते व भुसावळ आगाराला साधारण प्रति दिवस साडेपाच लाखांचे उत्पन्न मिळते मात्र तब्बल 61 दिवस एस.टी.ची थांबल्याने भुसावळ आगाराला साधारण तीन कोटींपेक्षा अधिक फटका बसला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळ दरम्यान भुसावळ आगाराने 32 बस फेर्यांचे नियोजन केले होते व त्यासाठी सहा चालक व सहा वाहकांना ड्युटी लावली मात्र प्रवाशांचा अत्यंत अत्यल्प प्रतिसाद असल्याने सकाळून तीन तर दुपारून तीन फेर्या झाल्याचे आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी म्हणाले.