माजी आमदार संतोष चौधरींसह जनआधारचा कामासाठी मदतीचा हात
भुसावळ:- शहरातील खडका रोडवरील रजा टॉवर चौकातून पाटीलमळा व पापा नगरकडे जाणार्या रस्त्यावरील नाल्याच्या पुलाची डागडूजी पालिकेकडे वारंवार मागणी करूनही न झाल्याने माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह जनआधारच्या नगरसेवकांनी पुढाकार घेऊन लोकसहभागतून दुरुस्ती सुरू केली मात्र पालिका प्रशासनाचे कर्मचारी पाठवून उलट नागरीकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आल्याने या परीसरातील नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पालिकेने हे काम वेळीच केले असते तर आम्हाला दुरुस्ती करण्याची वेळ आली नसती, अशी भावना या भागातील नागरीकांनी व्यक्त केली.
पुलाच्या कामासाठी पालिकेकडून विलंब
खडका रोडवरील रजा चौकात नाल्यावर 27 दुकाने पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आली होती. या नाल्यावर झालेल्या बांधकामामुळे नाल्यात कचरा अडकून खडका रोडच्या अंजूमन स्कूल व खडका रोड चौफुलीकडील भागात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही. यासह रजा चौकातून पाटीलमळा भागाकडे जाणार्या अरुंद पूलावरुन पाणी वाहून रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. यामुळे या पूलाची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती मात्र गेल्या चार महिन्यांपासून या कामाला पालिकेकडून विलंब केला जात होता. यामुळे सोमवारी स्थानिक नागरिक आणि जनआधारच्या नगरसेवकांनी लोकसहभागातून या कामाला सुरुवात केली. या पुलाची उंची वाढविण्यात येणार असल्याने पावसाळ्यात होणारा त्रास वाचेल यासह यामार्गावरुन मुस्लिम कब्रस्तानात अंत्ययात्रा नेतांना होणार्या अडचणींपासून नागरिकांची सुटका होणार आहे.
तंबीनंतर नागरिक संतप्त
नागरीकांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवारी दुपारी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले. पालिकेच्या परवानगीविना सुरू असलेल्या या कामाबाबत तोडफोड प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची धमकी या कर्मचार्यांनी प्रसंगी उपस्थित नागरीकांना दिल्याने नागरीक प्रचंड संतप्त झाल्यानंतर कर्मचार्यांनी काढता पाय घेतला.
मी सर्वसामान्यांसोबत -संतोष चौधरी
खडका रोड भागात अल्पसंख्यांक लोक राहतात. त्यांनी पुलाच्या कामासंदर्भात आपल्याकडे मदत मागितल्याने आपण साहित्य पुरवले. ‘अ’ वर्ग पालिका असलीतरी पालिकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. सत्ताधार्यांकडे कागदोपत्री बिले काढण्यासाठी पैसा असून सर्वसामान्य जनतेसह अल्पसंख्यांक लोकांची कामे होवू नयेत, असा सत्ताधार्यांचा कल आहे. मी सर्वसामान्यांसोबत असल्याचे माजी आमदार संतोष चौधरी कळवतात.