भुसावळात विक्रीसाठी जाणारा 18 हजारांचा गुटखा रावेरात जप्त

0

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ; दोघा महिलांना अटक

रावेर- टाटा मॅजिक प्रवासी गाडीतून अवैधरीतीने गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या भुसावळ येथील दोघा महिलांना रावेर पोलिस व अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी शनिवारी सापळा रचून पकडले. संशयीतांच्या ताब्यातून बंदी असलेला 18 हजार 550 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हवालदार ईस्माइल शेख, पोलिस नाईक अजय खंडेराव, नाईक दिवाकर जोशी, तुषार मोरे व महिला शिपाई रईसा तडवी व अन्न सुरक्षा अधिकारी अनिल गुजर यांनी मध्य प्रदेशाकडून येणारी टाटा मॅजिक (एम.पी.12 टी.0227) अडवून तिची तपासणी केली असता संशयीत परवीन शेख महमंद (28) व मुस्कान शेख हुसेन (22, रा.पापानगर, भुसावळ ) या दोन्ही महिलांच्या ताब्यातून 18 हजार 550 रुपयांचा प्रतिबंधीत विमल पान पसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुजर यांनी गुटख्याचे नमूने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.