भुसावळ। शहरातील पांडूरंग टॉकीज समोर असलेल्या लोहारकाम करणार्या पती – पत्नीचे आपसात भांडण झाल्याने यात पत्नीस मारहाण केल्याने विवाहितेला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता फिट येऊन मरण पावल्याची घटना शुक्रवार 28 रोजी दुपारी 11 वाजेच्या सुमारास घडली. मात्र विवाहितेच्या नातेवाईकांनी मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्यामुळे विवाहितेच्या पतीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
रूग्णालयात झाला मृत्यू
पांडूरंग टॉकीजसमोर असलेल्या नाल्याशेजारी लोहारकाम करणार्या परिवाराने व्यवसाय सुरु केला होता. सकाळी अनिल साळुंके यांचे पत्नी उषा साळुंके यांच्याशी भांडण झाले. रागाच्या भरात पतीने मारहाण केल्यामुळे विवाहितेस शहरातील खाजगी रुग्णालयात सकाळी 9 वाजेच्या सुमारास उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र बाथरुममध्ये फिट येऊन पडल्याने ही विवाहिता जागीच मरण पावल्याचे समजते. सायंकाळी ही घटना उघडकीस येताच डिवायएसपी निलोत्पल, एएसआय अनिस शेख, एएसआय मनोज पवार यांनी मृतदेहाची पाहणी केली. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण कळू न शकल्यामुळे याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. मयत विवाहितेस याआधी दैनंदिन आयुष्य जगत असतांना खरेच फिट्स येत होते का? याबाबत संबंधितांकडे चौकशी सुरु आहे. मृत्यूसाठी दिलेले नमुद कारण खरे आहे की, अजून वेगळे काही आहे याबाबत तर्कवितर्क सुरु आहे.