भुसावळात विविध मागण्यांसाठी एनआरएमयूचे लाक्षणिक उपोषण
आंदोलकांच्या घोषणांनी दणाणला परीसर : भुसावळ डीआरएम प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर
भुसावळ : नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे शहरातील डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रेल्वे कर्मचार्यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी बुधवार, 12 ऑक्टोबर रोजी घोषणाबाजी करीत लाक्षणिक आंदोलन केले. डयावेळी डीआरएम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कर्मचार्यांच्या घोषणांनी परीसर दणाणला.
नवीन पेन्शन योजना बंद करावी
ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या आवाहनानुसार महामंत्री वेणू पी.नायर याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय रेल्वेच्या सात हजार 516 रेल्वे स्थानकांंवर रेल्वे कर्मचार्यांनी लाक्षणिक उपोषण केले तसेच मध्य रेल्वेतील पाचही डीआरएम कार्यालयांच्या बाहेर उपोषण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर या उपोषणात रेल्वे कर्मचारी सहभागी झाले. जुनी पेन्शन योजना लागू करून नवीन पेन्शन योजना बंद करावी, रेल्वेच्या विविध कारखाने व अन्य कार्यालयातील उत्पादन होत असलेल्या कार्यालयातील खाजगीकरण आणि आऊटसोर्सिग बंद करावे, कोकण रेल्वेसहीत रेल्वेच्या संपतीची होत असलेली विक्री बंद करावी, कर्मचार्यांचे कमी केले जात असलेले पद बंद करावे, रीक्त जागेवर कर्मचार्यांची भरती करावी, कोकण रेल्वेला सुध्दा भारतीय रेल्वेत सामाऊन घ्यावे, महिला कर्मचार्यांचे सीसएलमध्ये वेतन कापणे बंद करावे, रेल्वे कॉलन्यांमधील दुरवस्था दूर करावी, राहाण्याजागे निवासस्थाने निर्माण करावी, रेल्वे कर्मचार्यांच्या समस्या दूर कराव्यात आदी मागण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. भुसावळ विभागातील 400 कर्मचारी लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले.
यांची लाक्षणिक उपोषणात उपस्थिती
यावेळी मंडळ सचिव आर.आर.निकम, मंडळ अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, सहाय्यक मंडळ सचिव इसरार खान, कोषाध्यक्ष जी.जी.ढाले, महिला अध्यक्षा पुष्पा किंडो आदी विविध पदाधिकारी, कर्मचारी या संपात सामील झाले.
डीआरएम प्रशासनाला निवेदन
सकाळपासून डीआरएम कार्यालयाच्या बाहेर बसलेल्या रेल्वे कर्मचार्यांनी दुपारी डीआरएम यांना मागण्यांचे निवेदन दिले. रेल्वेने कर्मचार्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अन्यथा भविष्यात लवकरच पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा मंडळ अध्यक्ष कापडे यांनी दिला.