भुसावळात वृद्धेचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले

0

भुसावळ- मॉर्निंग वॉकवरून घराकडे परतणार्‍या वृद्धेचे धूम स्टाईल चोरट्यांनी मंगळसूत्र लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी सहकार नगराजवळ घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी मीराबाई सोपान इंगळे (62, महागणपती प्लाझा, भुसावळ) या शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर घराकडे पायी जात असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या 22 ते 25 वयोगटातील दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अलगद लांबवले. या घटनेनंतर वृद्धेने आरडा-ओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, मोहमद वली सैय्यद आदींनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. घटनास्थळ परीसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले मात्र बांधकाम सुरू असल्याने ते शुक्रवारी रात्रीच बंद करण्यात आल्याने चोरट्यांची माहिती कळू शकली नाही. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास हवालदार साहिल तडवी करीत आहेत.