भुसावळ- शहरातील जुना सातारे भागातील वयोवृद्धा उषा शेणफडू पाटील यांच्या निवासस्थानी आलेल्या एका महिलेने बोलण्यात गुंतवून 20 हजारांची रोकड व 25 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत भर दिवसा लांबवल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आाल.
ओळख काढून केली फसवणूक
उषा पाटील यांच्या निवासस्थानी 35 ते 40 वयोगटातील महिला आली. तुमचे माहेर शेळगाव येथील असून मी सुध्दा तेथीलच रहिवासी असून कौतीक कोळी यांची मुलगी असल्याने तुमची भाची लागते, असे सांगून विश्वास संपादन केला. या महिलेने केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देत यासाठी तुमचा अर्ज भरून घेत आहे, त्यासाठी 20 हजार रूपयांचा खर्च लागणार असल्याचे सांगत गोड बोलून 20 हजार रुपये घेतले. माझी अंगणवाडीची मिटींग आहे तो आटोपून येते तोपर्यंत आधारकार्ड व रेशनकार्डच्या झेरॉक्स काढून ठेवा, असे सांगत माझ्या गळ्यात पोत नाही, तोपर्यंत तुमची पोत द्या, असे सांगून या भामट्या महिलेने 25 हजार रुपये किंमतीचे पोत लांबवत पोबारा केला. सायंकाळपर्यंत ही महिला न आल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय कंखरे करीत आहेत.