भुसावळ- शहरातील वाल्मीक नगर भागातील रहिवासी असलेल्या शम्मी प्रल्हाद चावरीया (30) या तरुणावर चार ते पाच जणांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकून प्राणघातक हल्ला केला. ही घअना सोमवारी रात्री आठच्या सुमारास पांडुरंग टॉकीजजवळ घडली. हल्ल्यानंतर हल्लेेखोर लागलीच पसार झाल्याने या भागात काहीशी पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे व सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रायसिंग व चावरीया परीवारात असलेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे समजते मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. जखमी चावरीयावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू असून अद्यापपर्यंत जखमीने फिर्याद न दिल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, हल्लेखोरांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.