पोलीस प्रशासनाच्या बेफिकीरीविषयी संताप ः अपघात घडल्यानंतर येते कारवाईबाबत जाग
भुसावळ (प्रतिनिधी)- शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचे नियम सांगण्यात येतात मात्र शालेय विद्यार्थ्यांची वाहनधारकांकडून असुरक्षित वाहतूक होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्वरीत लक्ष देवून विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक करणार्या वाहनधारकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. शहरातील विविध शाळांमधील लहान बालकांची खाजगी प्रवासी वाहनधारकांकडून शाळेपर्यंत वाहतूक केली जात .मात्र वाहतूक करतांना वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थी कोंबून वाहतूक केली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या असुरक्षीत प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून शाळा सुरू होताच शाळांमध्ये प्रबोधन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसाठी मार्गदशर्न करण्यात आले होते तसेच शालेय परीवहन समितीलाही याबाबत दक्षता घेण्याची सुचना देण्यात आली होती मात्र वाहतूक शाखेच्या या सुचनांकडे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनधारकांकडून दुर्लक्ष होत असून वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. काही विद्यार्थ्यांना रीक्षाच्या फ्रंट शिटवर बसवून वाहतूक केली जात असल्याने अपघात होण्याची भीती आहे. विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर पोलीस प्रशासनाला कारवाईबाबत जाग येत असल्याने सुज्ञ नागरीकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गॅसवरील वाहने
शहरातील बहुतांश वाहने ही अवैधरीत्या गॅसवरील असून अशा वाहनांमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी संभाव्य धोका टाळण्यासाठी शालेय परीवहन समिती व शासनाने त्वरीत उपाय योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शहरात अनेकदा गॅसवरील वाहनांनी पेट घेतल्याच्यादेखील घटना घडल्या आहेत.
नियमबाह्य वाहतूक
खाजगी वाहनधारकांकडून परीवहन विभागाची कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच काही रीक्षा परीवहन विभागाच्या नियमानुसार कालबाह्य झाल्या असतानाही या रीक्षांमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होते. याकडे परीवहन विभागाचे तसेच वाहतूक शाखेच्या पोलिसांचे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष होत आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या असुरक्षीत प्रवासाचा संभाव्य धोका लक्षात घेता परीवहन व वाहतूक शाखेच्या विभागाने वाहनधारकांवर करणे गरजेचे झाले आहे. सहा.अधीक्षक नीलोत्पल यांनी दखल घेण्याची गरज आहे.
शालेय परीवहन समिती कागदावरच
शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शाळेत दरवर्षी शालेय परीवहन समितीची स्थापना करण्यात येते. या समितीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत वाहतुकीसाठी नियत्रंण ठेवणे अत्यावश्यक आहे मात्र शाळास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या शालेय परीवहन समिती केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनधारकांचे चांगलेच फावले आहे. यामुळे या प्रकाराकडे शालेय व्यवस्थापन समितीने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.