सत्ताधार्यांसह पालिका प्रशासनाच्या डोळ्यात घातले अंजन
भुसावळ- अमृत योजनेच्या पाईप लाईनमुळे शहरातील रस्त्यांची वाताहत झाल्यानंतर नागरीकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत असतानाच शनिवारी गुरुनानक जयंती मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर शीख समाजबांधवांनी शहरातील मिरवणूक मार्गासह अन्य प्रमुख मार्गांची श्रमदानातून डागडूजी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी व पालिका प्रशासनाने आतातरी दखल घ्यावी, अशी अपेक्ष व्यक्त होत आहे.
डागडूजी न केल्याने श्रमदानातून दुरुस्ती
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची स्थिती बिकट झाली शीख समाज बांधवांनी गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने पालिकेकडे रस्ता डागडूजीची मागणी केली होती मात्र प्रशासनाने केवळ एक, दोन ठिकाणी माती टाकून खड्डे बुजवल्याने शुक्रवारी शीख समाजबांधवांनी स्वःखर्चातून खडी, कच आणून रस्त्यावर टाकला. श्रमदानातून खड्डे बुजवून पालिकेच्या डोळ्यात अंजन घातले. शहरातील जळगाव रोडवरील गुरुव्दारापासून वकिल गल्ली, गरुड प्लॉट, हॉटेल रसोई, हंबर्डीकर चौक, अमर स्टोअर्स स्टेशन रोड ते बाजारपेठेतील मिरवणूक मार्ग व वाल्मिक नगर या मार्गापर्यंतचे रस्ते बुजले. तसेच मिरवणूक मार्गावर नसलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संकूलाजवळील मान रेसिडेंन्सी भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून लोकहिताचे काम केले. यावेळी सरबतीज सिंग, जसप्रीतसिंग गुजराल, गुरमितसिंग चाहेल, बलजितसिंग गिल, परगट सिंग, चेतन चाहेल, गुरुसेवक सिंग, विक्रमजीत सिंग आदींनी श्रमदान केले तर पूर्ण शीख समाजाने या कार्यासाठी मदत दिली.