भुसावळात सकाळी उत्साह, दुपारी शुकशुकाट, सायंकाळनंतर रांगा

0

भुसावळ तालुक्यात 58 टक्के मतदान ; मतदार यादीत नावे न सापडल्याने मतदान न करताच मतदार परतले माघारी ; अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांना मनस्ताप ; शहरातील अनेक मतदान केंद्रावर सायंकाळनंतर लागल्या रांगा ; रणरणत्या उन्हामुळे घसरला मतदानाचा टक्का ; नवमतदारांचा मात्र मतदानासाठी उत्स्फूर्त पुढाकार

भुसावळ- राज्यातील तिसर्‍या टप्प्यातील रावेर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भुसावळ विधानसभा मतदारसंघात 58 टक्के मतदान झाले. अत्यंत संथगतीने मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आठ वाजेनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या गर्दीचा ओघ दिसून आला मात्र 11 वाजेनंतर उन्हाचा तडाखा बसू लागताच दुपारी तीन वाजेनंतर वातावरणात बदल झाल्यानंतर शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. विशेषतः शहरातील खडका रोड भागातील मतदान केंद्रांवर महिलांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा दिसून आल्या. निवडणुकीदरम्यान शहर व तालुक्यात 11 ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर लागलीच रीझर्व्ह मशीन बदलवण्यात आले तर ईव्हीएम बदलाच्या आरोपासह दुसर्‍याच उमेदवाराला मतदान झाल्याची खोटी तक्रार करणार्‍या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केल्याच्या दोन घटनांव्यतिरीक्त शहर व तालुक्यातील 173 मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले.

भुसावळात सेल्फि पॉईंटची मतदारांना भुरळ
भुसावळ शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या आवारात मतदारांसाठी सेल्फि पॉईंटची उभारणी करण्यात आल्याने मतदारांसह नवमतदारांसाठी ही बाब हर्षदायी ठरली. अनेकांनी आपल्या कुटुंबासोबत तसेच स्वतंत्रपणे हक्क बजावल्यानंतर त्याच्या आठवणी आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात साठवल्या.

भुसावळातील सखी मतदान केंद्रावर महिलांची गर्दी
भुसावळ शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने या केंद्राला सखी मतदान केंद्राची उभारण्यात करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर 786 मतदार हक्क बजावणार असून यात 371 महिलांचा सहभाग आहे. अधिकाधिक संख्येने मतदारांनी आपला हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून हा उपक्रम राबवण्यात आला. कोटेचा महाविद्यालयातील सखी मतदान केंद्रात गुलाबी रंगाचे आकर्षक पडदे लावण्यात आले असून फुग्यांनी सजावट करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाईदेखील महिलाच असून, बंदोबस्ताची जबाबदारीदेखील महिला पोलिस कर्मचार्‍यांकडे सोपवण्यात आली.

साकरीत नव मतदारांचे पूजन
भुसावळ तालुक्यातील साकरी येथे नवयुवक-युवतींना मतदानाचे महत्व कळण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते नारायण कोळी व भाजपा तालुका उपाध्यक्ष निर्मला कोळी यांच्यातर्फे सचिन सोनवणे, पूजा वारके, सायली बोंडे यांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती सुनील महाजन, माजी सभापती सोपानराव भारंबे, भाजपा तालुका सरचिटणीस नारायण कोळी, विनोद सोनवणे आदी उपस्थित होते.

मतदार यादीत नावे न सापडल्याने मतदार माघारी
दरवर्षाप्रमाणे यंदाही मतदारांची नावे मतदार यादीत न सापडल्याने मतदारांना आल्या आपली माघारी फिरावे लागले तर अनेक भागातील बीएलओ यांच्याकडून मतदारांना स्लीप वाटप झाल्या नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. निवडणूक विभागाकडून मतदारांच्या घरांपर्यंत स्लीप पोहोचवण्याचे आदेश बीएलओ यांना देण्यात आले असलेतरी अनेक भागातील बीएलओ यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे दिसून आले तर काही बीएलओ यांनी मतदान केंद्रावरच मतदारांना स्लीपही दिल्या.

शहर व तालुक्यात 11 ठिकाणी ईव्हीएम बदलले
भुसावळ शहरासह तालुक्यातील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी आल्याने ते प्रशासनाकडून तातडीने बदलण्यात आले. या प्रक्रियेला काही मिनिटांचा वेळ लागल्याने तात्पुरता मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली मात्र नंतर ईव्हीएम जोडताच प्रक्रिया सुरळीत झाल्याचे तहसीलदार महेंद्र पवार म्हणाले. भुसावळ शहरातील केंद्र क्रमांक 72, 103, 122 तसेच तालुक्यातील निंभोरा बु.॥-दीपनगर येथील 195, वरणगाव 274, दर्यापूर 212, कुर्‍हे पानाचे 281, कंडारी 182, वांजोळा 266 तर साकेगाव येथील केंद्र क्रमांक 7 वर पहाटे 6.15 ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शहरातील खडका रोडवरील पालिकेच्या शाळा क्रमांक 28 व 30 मधील मतदान केंद्र क्रमांक 103 मध्ये सायंकाळी चार ते पाच दरम्यान ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांची मोठी गर्दी झाली मात्र सायंकाळी सहा वाजेनंतर शाळेचे प्रवेशद्वार बंद करून रांगेत असलेल्या सर्व मतदारांना हक्क बजावू देण्यात आल्याचे तहसीलदार महेंद्र पवार म्हणाले.

मयत मतदारांची यादी मिळालीच नाही
प्रशासनातर्फे निवडणूक केंद्रावर नियुक्त अनेक बीएलओ यांना मयत मतदारांची यादी मिळाली नसल्याची ओरड आहे तर काही ठिकाणी मात्र यादी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. मयत मतदारांची यादी समोर नसल्याने समोरील मतदार नेमका कोण? हेदेखील ओळखणे कठीण झाले होते तर अधिकार्‍यांनी मात्र प्रत्यक्षदर्शी पुरावे पाहून मतदाराला हक्क बजावू दिला.

स्वच्छता अभियानाचे धडे देणारे गुरूजी उघड्यावर
ग्रामीण भागातील उघड्यावर शौचास बसण्याचे दुष्पपरीणाम सांगणार्‍या गुरूजींना अर्थात निवडणूक अधिकारी-कर्मचार्‍यांना ग्रामीण भागातील शाळांमध्ये शौचालयांच्या अभावी उघड्यावर जाण्याची वेळ आली तर रात्रभर मंडप-डेकारेटर्सच्या गाद्यांमधील ढेकणांची या कर्मचार्‍यांची झोप उडवली शिवाय अनेक केंद्रावर विजेची सोय नसल्याने रात्रीसह दुसर्‍या दिवशी संपूर्ण मतदान प्रक्रिया 44 अंश तापमानात घामाच्या धारांमध्ये काढावी लागल्याने या कर्मचार्‍यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. शिवाय पोलिंग अधिकार्‍यांना अवघा एक हजार 300 रुपये भत्ता मिळाल्यानेही नाराजी व्यक्त करण्यात आली. मुळात निवडणुकीसाठी पाच बैठका घेण्यात आल्यानंतर किमान टीएडीए भत्ता अपेक्षित असताना प्रशासनाकडून एक प्रकारे अन्याय झाल्याची भावनाही व्यक्त करण्यात आली.