शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर गोपनीय कारवाई ; बाजारपेठ हद्दीत कट्टा बाळगणार्या आरोपी न्यायालयीन कोठडी
भुसावळ- ताप्ती स्कूलच्या शिपायाकडे गावठी पिस्टल आढळल्याची घटना ताजी असतानाच शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर खाजगी वाहनावर चालक असलेल्या संशयीताकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आल्याने गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. आठवड्यापूर्वी 3 मार्च रोजी नाहाटा चौफुलीवर एका कुविख्यात आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी गावठी कट्टा जप्त केल्याने शहर हे शस्त्र तस्करीचा अड्डा तर बनला नाही ना? असा प्रश्न उपस्थित करण्यास वाव आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी धडक कारवाई करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सलग दुसर्या दिवशी कट्टा जप्त
ताप्ती पब्लिक स्कूलचा खाजगी शिपाई सचिन पांडुरंग पारधी (24, रा.मोंढाळा, ता.भुसावळ) याच्या ताब्यातून दहा हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजता जामनेर रोडवरील घासीलाल वड्याजवळून बाजारपेठ पोलिसांनी जप्त केले होते. कारवाईला 24 तास उलटत नाही तोच शहर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या पंचायत समितीजवळील वैशाली झेरॉक्स दुकानाजवळ एका संशयीताजवळ गावठी कट्टा असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. हवालदार मोहम्मद वली सैय्यद, सुनील सैंदाणे, विजय पाटील, संजय पाटील यांच्या पथकाने झेरॉक्स दुकानावर पडताळणी केल्यानंतर गौरव राजू वाघ (27, रा.अंगुरी मेडिकलजवळ, शिवाजी नगर, भुसावळ) या संशयीताची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 10 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आढळून आला. या प्रकरणी सुनील सैंदाणे यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 12 मार्च दुपारी साडेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिस तपासात आरोपी हा खाजगी वाहनावर चालक असल्याचे सांगण्यात आले.
खाजगी संस्थेतील शिपाई कोठडीत
ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये खाजगी शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सचिन पांडुरंग पारधी (24, रा.मोंढाळा, ता.भुसावळ) यास सोमवारी बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने जामनेर रोडवरील घासीलाल वड्याजवळून 10 हजार रुपये किंमतीच्या गावठी पिस्टलसह अटक केली होती. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयीताला न्यायालयीन कोठडी सुनावली.