भुसावळात सहा वडापाव विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे
लॉकडाऊन उल्लंघण ; दोनशे जणांवर कारवाई तर पडदे न लावणार्या 70 रीक्षा चालकांकडून प्रत्येकी 300 रुपये दंड वसुल
भुसावळ : शहरात ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध कडक करण्याचे निर्देश जिल्हाधिकर्यांनी दिल्यानंतर सोमवारी सकाळपासून पोलिस व पालिका प्रशासनाने धडक कारवाईला सुरू केली. यावल रस्त्यावरील गांधी पुतळ्याजवळ वडा-पाव विक्रेत्यांना केवळ होम डिलेव्हरीची परवानगी असताना जागेवरच ग्राहकांना वडा विक्री होत असल्याने सहा विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली. शहर, बाजारपेठ व तालुका हद्दीत दिवसभरात विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांसह नॉन इसेन्शीयल दुकाने सुरू ठेवणार्या सुमारे 200 दुकानदारांविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली तसेच रीक्षामध्ये रीक्षा चालक आणि प्रवासी यांच्यात एक पडदा लावण्याच्या सूचना दिल्यानंतरही त्याचे पालन न करणार्या 70 रीक्षा चालकांवर प्रत्येकी 300 रुपयांप्रमाणे दंड वसुल करण्यात आला तसेच मोटार व्हेईकल अॅक्टच्या शंभर केसेस करण्यात आल्या.
सहा वडा-पाव विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे
शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना राबवल्या जात आहेत. सोमवारी सकाळी सात वाजेपासून पोलिस प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली. यावल रस्त्यावरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर असलेल्या वडा विके्रत्यांकडून ग्राहकांना जागेवरच वडा विक्री केली जात असल्याने पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर निरीक्षक बाळासाहेब ठोंबे व सहकार्यांनी पाच वडा विक्रेत्यांसह एका आईस्क्रीम विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. वाघचौरे म्हणाले की, वडा-पाव विक्रेत्यांना केवळ ग्राहकाने ऑर्डर केल्यानंतर घरपोच वडा पार्सल (होम डिलेव्हरी) करण्याची परवानगी आहे मात्र विके्रते जागेवरच ग्राहकांना वडा विक्री करताना आढळल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
लॉकडाऊन उल्लंघण : 200 जणांवर कारवाई
सोमवारी सकाळी सात ते अकरा दरम्यानच अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्याचे आदेश असतानाही नॉन इसेन्शीयल दुकाने सुरू असल्याने तसेच रस्त्यावर काहीही कारण नसताना फिरणार्या नागरीकांवर पोलिसांनी दिवसभरात सुमारे दोनशे कारवाया करीत दंड वसुल केला. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघण करणार्या सुमारे शंभर वाहन धारकांवर प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
डेली मार्केट सील : पाच ठिकाणी भरवला बाजार
शहरातील डेली मार्केट रात्रीच पोलिसांनी सील केले तर पाच ठिकाणी बाजाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ऐरवी नागरिकांच्या गर्दीने गजबजणार्या डिस्को टॉवर ते अप्सरा टॉवर हा संपूर्ण परिसर अक्षरश: ओस पडला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान, टिव्ही टॉवर मैदान, भुसावळ हायस्कूल आणि भुसावळ हायस्कूल याठिकाणी बाजारासाठी जागा देण्यात आली व पालिकेने ठरवून दिलेल्याठिकाणी बाजार भरविण्यात येऊन चोखपणे अकरालाच बंद करण्यात आला.
शहरात नाकाबंदी
शहरात बाजारपेठ पोलिस ठाणे चौक, महात्मा गांधी पुतळा, नाहाटा चौफुली, रजा टॉवर आदी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. याठिकाणी बॅरीकेटस लावून सव्वा अकरानंतर हे पॉईंट सक्रिय होऊन विनाकारण फिरणार्या नागरीकांवर कारवाई करण्यात आली तसेच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन तर बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच अशा एकूण सात पथकांनी बाजारात गस्त घातली.
इव्हीनिंग वॉक करणार्यांवर कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भल्या पहाटे व सायंकाळीदेखील नागरी क मोठ्या प्रमाणावर घोळका करून पायी फिरत असल्याने अशांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. सोमवारी सायंकाळी पायी फिरणार्या दहा नागरीकांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले.