अनैतिक संबंधाच्या संशयातून घटना घडल्याचा अंदाज : आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना
भुसावळ : अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून साकेगाव येथील 40 वर्षीय दुध विक्रेत्याचा भुसावळातील जुना सातारे भागातील कोळी वाड्यात खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या घटनेनंतर आरोपी पसार झाला. या घटनेत नासीर बशीर पटेल (40, रा.साकेगाव, ता.भुसावळ) यांचा मृत्यू झाला. भुसावळात भरदिवसा झालेल्या खुनाच्या या घटनेने भुसावळ पुन्हा हादरले असून दिवसागणिक वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरली आहे.
दोन वेळा रॉड मारताच झाला मृत्यू
साकेगाव येथील रहिवासी असलेले नासीर पटेल हे दुग्ध संकलन विक्रीचे काम करतात शिवाय ते भुसावळातील मामाजी टॉकीज नजीकच्या विशाल डेअरीवर कामाला आहेत. नेहमीप्रमाणे ते सोमवारी सायंकाळी पाच वाजता दुचाकी (एम.एच.19 ए.डी.2006) वरून डेअरी मालकाच्या मुलासह जुना सातारा भागातील कोळीवाड्यात गेले होते. दुचाकी लावल्यानंतर ते नेहमीच्या ग्राहकांकडे दुध देत असतानाच समोरच राहणार्या धीरज गणेश शिंदे (22, जुना सातारा, भुसावळ) या संशयीताने लोखंडी रॉडने पटेल यांच्या डोक्यावर रॉड मारल्याने ते जमिनीवर कोसळले तर पुन्हा त्यांच्यावर जोरदार रॉडने हल्ला चढवण्यात आल्याने अतिरक्तस्त्राव होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिका तासभर न आल्याने मृतदेह जागीच पडून होता.
खुनाने पुन्हा हादरले भुसावळ
खुनाची माहिती पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे प्रभारी निरीक्षक दिलीप भागवत, शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक के.टी.सुरळकर व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला तसेच फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले.
अनैतिक संबंधाच्या संशयाने दुध विक्रेत्याचा बळी
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाच वाजता नासीर पटेल आल्यानंतर आरोपी धीरजने घरातील अवजड लोखंडी रॉड घेत नासीर पटेल यांच्या डोक्यावर दोनवेळा ताकदीनिशी मारल्याने त्यांचा जागीच अतिरीक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, खुनानंतर आरोपी पसार झाला असून त्याच्या शोधार्थ शहर पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. मयत नासीर पटेल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व भाऊ व वडिल असा परीवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.