भुसावळात साडूवर हल्ला : महिला बचावली

0

भुसावळ- पत्नी व मुलांपासून विभक्त राहणार असलेल्या पतीने आपल्या साडूसह त्याच्या पत्नीवरच चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र कुटुंबाने दाखवलेल्या समयसुचकतेने अप्रिय घटना टळली तर आरोपीने तत्पूर्वी कुटुंबियांच्या अंगावर तिखट फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील लोणारी मंगल कार्यालयाच्या पुढे असलेल्या हुडको कॉलनीत गुरूवारी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास घडली. यामुळे या परीसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसात मात्र गुन्हा दाखल नाही.
जळगावमधील नेरीनाका भागातील रहिवासी रावसाहेब अंकुश पाटील यांची पत्नी त्यांच्या समवेत राहत नसून ती तिच्या माहेरी बोदवड येथे मुलांसह राहते तर भुसावळातील हुडको कॉलनीत रावसाहेबचे साडू जीवन पाटील राहतात. गुरुवारी रावसाहेब त्याच्या साडूच्या घरी हुडको कॉलनीत आल्यानंतर त्याने एका हातात चाकू धरत दुसर्‍या हाताने लता व किशोर पाटील यांच्या डोळ्यात तिखटाची पूड फेकली. या प्रकाराने घरातील सदस्य हादरले. यावेळी सदस्यांनी घरातील काठी संशयीत रावसाहेबच्या हातावर मारल्याने चाकू बाजूला पडला तर तो वरच्या मजल्यावरून खाली पडल्याने जखमी झाला. शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, शहर पोलिसात याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता तर डीवायएसपी गजानन राठोड यांनी या प्रकरणाची माहिती जाणून घेतली.