भुसावळात साडेचार हजार लाभार्थींना घरकुलांचा लाभ देणार

0

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची माहिती : भुसावळात भाजपा बुथ प्रमुखांचा मेळावा

भुसावळ- शहरातील चार हजार 500 लाभार्थींना आगामी काळात साडेचार स्वेअर फूट आकाराचे घर देण्यात येणार असून त्यासाठी शासनाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची ग्वाही माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिली. खडसे म्हणाले की, शहरातील अंधकार आता दूर झाला असून शहरात विकासकामांचे पर्व सुरू झाले आहे. आगामी वर्ष भराच्या आत भुसावळातील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्‍न मार्गी लागणार असून या दवाखान्यात पदे मंजूर करण्यासंदर्भात आपली बुधवारी मंत्र्यांसोबत बैठक असल्याचेही ते म्हणाले. शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
माजी मंत्री खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, महिला शहराध्यक्षा मीना लोणारी, अलका शेळके, शैलजा पाटील, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, गटनेता मुन्ना तेली, जि.प.चे माजी सदस्य हर्षल पाटील, दिनेश नेमाडे, पवन बुंदेले, सुमित बर्‍हाटे, अनिकेत पाटील आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

होय जळगाव-भुसावळात मीच आणली अमृत योजना
माजी मंत्री खडसे म्हणाले की, मंत्री पदावर असताना कधी भेदभाव केला नाही. जळगावसह भुसावळात भाजपाची सत्ता नव्हती तरी आपण अमृत योजना या शहरासाठी मंजूर केली. त्याचे श्रेय माझेच आहे. सरकारच्या विविध योजना असल्यातरी त्या तळागाळातील जनेपर्यंत पोहोचायला हव्यात. भुसावळ पालिकेच्या दवाखान्यात आगामी काळात अधिकाधिक सुविधा पुरवण्याबाबत आपण नगराध्यक्षांना सूचना केल्याचे ते म्हणाले.

तळागाळातपर्यंत योजना पोहोचवा -रक्षा खडसे
शासनाच्या योजना तळा-गाळातील लाभार्थीपर्यंत पोहोचवा, असे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. आयुष्यमान योजनेचे जिल्ह्यात पाच लाख लाभार्थी असून त्यांना लाभ मिळण्यासाठी बुथ प्रमुखांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. भुसावळात भाजपाची सत्ता आल्यानंतर विकासकामे झाल्याचे त्या म्हणाल्या.

निवडणुकांसाठी सज्ज व्हा -आमदार सावकारे
आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले. भाजपाची सत्ता नसताना वन बुथ टेन युथ संकल्पना राबवल्यानंतर यश मिळाले त्यामुळे अमित शहा यांनी आता वन बुथ थर्टी युथ संकल्पना राबवल्याचे ते म्हणाले.

भुसावळात विकासपर्व -रमण भोळे
भुसावळात आता खर्‍या अर्थाने विकासपर्व सुरू झाल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. शहरातील मामाजी टॉकीज रस्त्याचे काम , अमृत योजना तसेच एलईडी पथदिवे लावण्यात आल्याने नागरीकांमध्येही विकासकामे होत असल्याने समाधान असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण होईल, त्यासाठीचा निधीही पालिकेत जमा असून अमृत योजनेनंतर ही कामे मार्गी लागतील, असे त्यांनी सांगितले.

भाजपा सरचिटणीसांनी घेतली शाळा
भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी मार्गदर्शनात बुथ प्रमुखांसह उपस्थितांची चांगलीच हजेरी घेतली. कार्यक्रमास उपस्थित नसलेल्या बुथ प्रमुखांना तातडीने पदावरून हटवण्याची त्यांनी शहराध्यक्षांना सूचना केली उपस्थित नसलेल्या नगरसेवकांनाही यापुढे कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची तंबी देण्याचे पदाधिकार्‍यांना बजावले. 131 पैकी 99 बुथ समित्या गठीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी देत खासदार खडसेंनी आतापर्यंत 38 बैठका घेतल्याच सांगत 39 वी बैठक भुसावळात होत असल्याचे ते म्हणाले.