सामाजिक कार्याची दखल : रोटरी रेलसिटीचा उपक्रम
भुसावळ – सामाजिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या शहरातील सात मान्यवरांना ‘भुसावळ प्राईड पुरस्कार 2018’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे आयएमए हॉलमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. प्रमुख अतिथी म्हणून दीपनगरातील नवीन 660 मेगावॅट प्रकल्पाचे मॅनेजर अभियंता मोहन आव्हाड, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी अध्यक्ष आशिष पटेल, सचिव देवा वाणी, भुसावळ प्राईड प्रोजेक्ट चेअरमन अनिकेत पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचा परीचय संदीप जोशी यांनी केला. प्रास्ताविक अध्यक्ष आशिष पटेल यांनी केले. भुसावळ प्राईड 2018 पुरस्कार्थींचा परिचय सोनू मांडे यांनी करून दिला.
या मान्यवरांचा झाला गौरव
शिक्षण क्षेत्रातून बालभारती अभ्यास मंडळ सदस्य व शाळासिद्धी राष्ट्रीय कार्यक्रम यात राज्यस्तरावर केलेल्या कार्याबद्दल द. शि. विद्यालयातील उपशिक्षक डॉ. जगदीश पाटील, स्वच्छता क्षेत्रातून भुसावळ शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करून भुसावळ नगरपरिषदेत स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करत शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये सर्वात वेगवान बदल करणार्या शहराच्या दर्जा मिळण्यात मोलाची भूमिका बजावून यशस्वी कामगिरी करणारे रणजितसिंग राजपूत, आरोग्य क्षेत्रातून भुसावळ रनर्स गु्रपच्या माध्यमातून भुसावळकरांना धावण्याचे महत्व सांगून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे व भुसावळ रन भुसावळ या पोलिस दलाचा उपक्रम यशस्वीतेसाठी मोलाची भूमिका बजाविणारे प्रवीण फालक, पर्यावरण क्षेत्रातून वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून देणारे किंबहुना ते वृक्ष जगविण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणारे शेखर जंगले, समाजसेवा क्षेत्रातून बिनपगारी स्मशानभूमीत राहून तिथे येणार्या मृतदेहाची संपूर्ण अंत्यविधी पार पाडणारे व तिथेच राहून परिसराची रखवाली करणारे अरूण रंधे, जलसेवा क्षेत्रातून रस्त्यावरील येणार्या जाणार्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी त्यांच्यासाठी विनामूल्य पाण्याचे जार दिवसभर उपलब्ध करून देणारे रणजित खरारे, क्रीडा क्षेत्रातून फूटबॉलच्या खेळात भुसावळचे नाव राज्यस्तरावर नेणारे खेमचंद पाटील या सर्वांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देवून भुसावळ प्राईड 2018 पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अभियंता मोहन आव्हाड व आ. संजय सावकारे यांनी भुसावळच्या या सात व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून भुसावळ प्राईड शोधणार्या रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी परिवाराचेही कौतुक केले. तसेच अशा व्यक्तींची आज समाजाला, देशाला यथार्थ गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन संदीप सुरवाडे यांनी तर आभार अनिकेत पाटील यांनी मानले.