ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची जनआधार विकास पार्टीची मागणी
भुसावळ (प्रतिनिधी)- शौचालयाचा सेप्टी टँकचा भराव कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना शहरातील पंचशील नगरात शुक्रवारी सकाळी घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी शौचालयाचे काम करणार्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी प्रांताधिकार्यांसह पालिका प्रशासनाकडे केली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणावेळी पंचशील नगरात जुन्या शौचालयास रंगरंगोटी व डागडूजी करून उभारणी करण्यात आली होती.
स्फोटासदृश आवाजाने सारेच हादरले
पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या पूर्वी शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या डागडूजी केली असलीतरी हे काम निकृष्ट पद्धत्तीने झाल्याचा आरोप आहे. पंचशील नगरातील महिला व पुरूषांच्या 16 सीटच्या शौचालयाचीही याच पध्दतीने डागडूजी करण्यात आली. शुक्रवारी सकाळी पंचील नगरातील या शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये मोठा आवाज होऊन भराव व त्यावर टाकलेला स्लॅब कोसळला. याच वेळी शौचालयाचा वापर करीत असलेले संजय वाडे (वय 40, रा. मच्छी मार्केट, भुसावळ), मंगला ठाकूर (वय 29 रा. पंचशील नगर, भुसावळ), एक 18 वर्षांची युवती व एक दहा वर्षीय बालक थेट सेफ्टी टँकमध्ये कोसळले. मोठा आवाज आणि सेफ्टी टँकमध्ये कोसळणार्यांनी आरडा-ओरड केल्याने परिीसरातील नागरीक धावले. दोराच्या सहाय्याने अडकलेल्या चारही जणांना बाहेर काढण्यात आले. यातील संजय वाडे व मंगला ठाकूर यांना गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने जीवीतहानी टळली.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करा
या प्रकरणी पालिकेच्या विरोधी पक्ष असलेल्या जनआधारचे गटनेते उल्हास पगारे, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, राहुल बोरसे, रवी सपकाळे, अष्टभुजा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देवून जखमींची माहिती दिली. सत्ताधारी पक्षाचे संबंधीत नगरसेवक आणि सदरील शौचालयाच्या डागडूजीचे काम घेतलेल्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, जखमींना उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी प्रांतांना करण्यात आली.