भुसावळात सोशल डिस्टन्सचे पालन करीत भाजीपाला लिलावास सुरुवात

0

भुसावळ : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून परवानाधारक घाऊक व्यापारी व आडतदारांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स पाळत भाजीपाला लिलावास सुरुवात झाली. 190 व्यापारी व आडतदारांना प्रशासनाकडून त्यासाठी परवाने देण्यात आले होते. सोमवारी बाजार समितीच्या आवारात भाजीपाला लिलावासाठी जागेची आखणी कृउबा सभापती सचिन संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती.

कृउबाकडून विविध उपाययोजना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या माध्यमातून होणारे भाजीपाला लिलाव बंद करण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने आता जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार घाऊक परवानाधारक व्यापारी व आडतदारांना परवाने दिले आहेत. मंगळरपासून बाजार समितीच्या यार्डात भाजीपाला लिलावाला सुरुवात झाली. लिलावाच्या प्रक्रियेसाठी बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी व सचिव नितीन पाटील यांनी विविध उपाययोजना केल्या होत्या. सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत लिलावासाठी जागेची आखणी करण्यात आल्यानंतर 20 पेक्षा अधिक व्यापारी बाजार समितीच्या आत जाणार नाहीत याची काटेकोरपणे काळजी घेण्यात आल्याचे दिसून आले.