भुसावळात स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून नागरीक करू शकतील तक्रार

0

भुसावळ- शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छता होत नसल्याची ओरड असून त्या माध्यमातूनच पालिकेने घंटागाड्यांना जीपीएस ट्रॅकर सिस्टीम बसवली असून आता स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रार करता येणार असल्याने प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्‍न निकाली निघणार असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले. पालिकेने आगामी स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारच्या अ‍ॅपचे सहा हजार डाऊलोडींग पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याचेही ते म्हणाले.

नववर्षात होणार स्वच्छता सर्वेक्षण
देशभरात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी स्वच्छ सर्वेक्षणात चार हजार अ‍ॅप डाऊनलोडींग करण्याचे उद्दिष्ट होते तर यंदा सहा हजार उपयोगकर्ते वाढवण्यावर पालिकेचा भर असणार आहे. केंद्र शासनाने स्वच्छता अ‍ॅप एमओयुडी हे स्वच्छता अ‍ॅप विकसीत केले आहे. या अ‍ॅपच्या वापरासाठी मोबाईलमधील प्ले स्टोअरवर जावून स्वच्छता अ‍ॅप एमओयुडी असे शोधून पसंतीच्या भाषेत डाऊनलोड करता येते. अ‍ॅपव्दारे अस्वच्छतेच्या तक्रारी नोंदवायची असेल तर अस्वच्छ जागेचा फोटो काढून तो अ‍ॅपवर टाकता येतो. ही तक्रार प्राप्त झाल्यास पालिका आठ ते 12 तासांमध्ये समस्येचे निवारण करणार आहे.