भुसावळात हार्डवेअर दुकान फोडले : आठ लाखांचा माल लंपास
भुसावळात शहरातील घटना : व्यापार्यांमध्ये पसरली भीती : पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह
भुसावळ : शहरातील गजबजलेल्या आठवडे बाजारातील हार्ड वेअरचे दुकान फोडत चोरट्यांनी सुमारे आठ लाखांचा माल लांबवल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जुन्या चोर्या-घरफोड्यांचा तपास लागत नसताना नव्याने चोर्या होवू लागल्याने व्यापार्यांमध्ये भीती पसरली आहे शिवाय पोलिसांच्या गस्तीवरही या प्रकाराने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील सीसीटिव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीनही लांबवल्याने अट्टल चोरट्यांनी हे काम केल्याचा संशय आहे.
व्यापार्यांमध्ये पसरली भीती
शहरातील आठवडे बाजारातील अशोक हार्डवेअर हे जितेंद्र बळीराम आहुजा यांच्या मालकिचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता दुकान उघडल्यानंतर दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आल्याचे दिसून आले तर लोखंडी जाळ्या, पाईप, नळांचे खोके, फिटींगचे साहित्य आदी साहित्य अस्ताव्यस्त दिसून येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. दुकानात चोरी झाल्याचे कळताच व्यापार्यांसह नागरीकांची गर्दी जमली.
चोरीनंतर पोलीस अधिकार्यांची धाव
चोरट्यांनी पितळी नळ, नळ फिटींगचे पितळी साहित्य, पितळी व्हॉल्व्ह असा मोठ्या प्रमाणावर पितळी माल लांबवला डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. अधिकार्यांनी दुकान मालक आहुजा यांच्याशी चर्चा करीत नेमकी माहिती जाणून घेतली. चोरीनंतर श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले.