भुसावळ- येथील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल चाहेल पंजाब ढाब्यावर उभा केलेला ट्रक चोरट्यांनी रात्रीतून लांबविल्याची घटना 2 जून रोजी दुपारी 12 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात ट्रक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पंजाब येथून गुजराथ येथे माल भरण्यासाठी जात असलेली ट्रक (पी.बी .13 ए.आर. 3245) हा 1 जून रोजी सायंकाळी पाच वाजता महामार्गावरील हॉटेल चाहेल पंजाब ढाब्याच्या समोरील मोकळ्या जागेत जगसिशसिंग गुरूचरणसिंग शोकोन (रा.शेकीपुरा बस्ती ,पंजाब) यांनी उभा केला होता व ते बहिणीकडे गेले होते. दुसर्या दिवशी दुपारी 12 वाजता ते हॉटेलवर आले असता तेथे त्यांची ट्रक आढळला नाही. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चार लाख 50 हजार रुपये किंमतीचा ट्रक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र बिर्हाडे पुढील तपास करीत आहे.