भुसावळात 12 दिवसानंतर अखेर पाणीपुरवठा सुरळीत

0

टप्प्याटप्प्याने शहरवासीयांना पाणी ; काटकसरीने वापराचे आवाहन

भुसावळ- पालिकेच्या बंधार्‍यातील पाणी संपल्याने 7 एप्रिलपासून बंद असलेला पाणीपुरवठा अखेर गुरुवारी सुरू करण्यात यंत्रणेला यश आले. गुरूवारी सकाळपासून जामनेर रोडवरील नाहाटा कॉलेज ते पंचशील नगर, सिंधी कॉलनी, दिनदयाल नगर, सोनिच्छावाडी परीसर, चमेली नगर, श्रीराम नगर, वांजोळा रोड, चक्रधर नगर भागात पाणीपुरवठा करण्यात आल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. त्यानंतर उर्वरीत भागातील खडका रोड सह शहरातील सर्वच भागात 24 तासात रोटेशननुसार पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले. तब्बल 12 दिवसानंतर नळांना पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी महिलावर्गाची मोठी गर्दी झाली होती.

गुरूवारी सकाळी बंधार्‍यात आले पाणी
हतनूर धरणातून सोडण्यात आलेले पाण्याचे आवर्तन गुरूवारी पहाटे पालिकेच्या तापी नदीतील साठवण बंधार्‍यात पोहोचल्यानंतर रॉ वॉटर यंत्रणा सुरू करण्यात आली. सुरुवातीला जामनेर रोडपासून पाणीपुरवठ्याला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी शहरातील पाटील मळा, लक्ष्मी नारायण नगर, रामदेव बाबा नगर, तळेले कॉलनी, गौसिया नगरात पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हतनूरचे आवर्तन 45 दिवस पुरवायचे असल्याने नागरीकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती पिंटू ठाकूर यांनी केले आहे.