भुसावळ : शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीच्या वाढलेल्या प्रमाणानंतर यावर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी एकाचवेळी शहर, बाजारपेठ व तालुक्यातील 13 भंगार व्यावसायीकांच्या गोदामांची तपासणी केल्याने भंगार व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी दुचाकी, तीन चारचाकीचे लाखो रुपयांचे स्पेअर पार्टस् जप्त केले असून गोदाम मालकांनी त्याबाबत कायदेशीर कागदपत्रे सादर न केल्यास न्यायालयाच्या परवानगीने तपास करून गुन्हा दाखल करण्याच इशारा पोलिस उपअधीक्षकांनी दिला आहे.
लाखो रुपयांचे सुटे भाग जप्त
भुसावळ शहर, बाजारपेठ व तालुक पोलिस ठाणे हद्दीत राहणार्या 13 भंगार व्यावसायीकांकडे पोलिसांनी एकाचवेळी दहा पथकांच्या माध्यमातून तपासणी केली. एका पथकात एक अधिकारी व तीन कर्मचारी असा सहभाग राहिला. पोलिसांनी तीन बंद चारचाकी, दोन रीक्षा, 20 दुचाकी, दोन दुचाकींचे इंजिन, 45 इलेक्ट्रीक मोटार बॉडी, चार व्हील डिस्क, आठ पाईप, दोन अँगल, दोन नवे तार बंडल, तीन जनरेटर व एक सीपीयु आदी संशयीत मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित गोदाम चालकांना याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाकडून मागणार परवानगी
पोलिसांनी ज्या संशयीत साहित्यांचे पंचनामे केले आहेत त्याबाबत बुधवारी न्यायालयाकडून पोलिस रीतसर परवानगी घेऊन गोदाम मालकांची चौकशी करतील शिवाय साहित्य नेमके कोठून खरेदी केला वा कुणी विकले याबाबत सविस्तर चौकशी करतील शिवाय आता यापुढे गोदाम मालकांना पोलिसांनी रजिष्टरमध्ये भंगारात विकत घेतलेल्या साहित्याचा तपशील लिहिण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरातील विविध भागात पोलिसांनी नाकाबंदीदेखील केली.
यांचा कारवाईत सहभाग
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक अनिल मोरे तसेच शहर व बाजारपेठ तसेच आरसीपीच्या पथकाने ही कारवाई केली.