भुसावळ- भुसावळ युवा सेनेतर्फे नवमतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत 22 रोजी नाहाटा महाविद्यालयासमोर नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी एक या वेळेत या शिबिरात तरुण मुला-मुलींसह महिला व दिव्यांग नागरीकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख हेमंत बर्हाटे, युवा सेना शहर चिटणीस सुरज पाटील यांनी केले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीरत मतदार नोंदणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मतदारांच्या जनजागृतीसाठी युवासेना जनजागृतीचे काम करीत आहे. जिल्ह्यात दिव्यांग बांधवांनी संख्या मोठी असली तरी तेवढी मतदार नोंदणी नाही.
या कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन
मतदार ओळखपत्रासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण केल्याचा पुरावा असणे गरजेचे आहे. पालिकेतर्फे देण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक संस्थेने दिलेले जन्मदिनांक प्रमाणपत्र या अर्जाबरोबर जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे शिवाय अर्जदार इयत्ता दहावी उत्तीर्ण असेल तर ती जन्मतारीख नमूद केलेली दहावीची गुणपत्रिका असणे गरजेचे आहे किंवा जन्मतारीख नमूद केलेली आठवीची गुणपत्रिका आवश्यक आहे. शिबिरासाठी येताना दोन पासपोर्ट आकाराची रंगीत छायाचित्रे, रहिवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका, विद्युत देयक, आधारकार्ड, फोन बिल, भाडे तत्त्वावर राहात असल्यास मालकाचा करारनामा, वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पारपत्र, पॅनकार्ड व जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आल्याचे युवा सेना शहर चिटणीस सुरज पाटील कळवतात.