भुसावळात 24 पासून खान्देश नाट्य महोत्सव

0

महोत्सव केंद्रीय समितीचे अध्यक्ष मोहन फालक यांची भुसावळात पत्रकार परीषदेत माहिती ; नाट्यगृहाच्या निर्मिती पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन ; 36 कलावंत लावणार हजेरी

भुसावळ- शहरातील उत्कर्ष कलाविष्कारतर्फे (स्व.) देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सवाचे 24 ते 26 मे दरम्यान जामनेर रोडवरील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महोत्सव केंद्रीय समितीचे अध्यक्ष मोहन फालक यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परीषदेत दिली. नाहाटा महाविद्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत फालक म्हणाले की, यंदाच्या महोत्सवात तीन नाटकांचे सादरीकरण केले जाणार असून बाहेरील 36 कलावंत हजेरी लावतील. प्रसंगी स्थानिक कलावंतांच्या कलाचे सादरीकरण केले जाईल.

महोत्सवाचे 10 वर्षांपासून आयोजन
मोहन फालक यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षापासून येथे खान्देश नाट्य महोत्सव होत आहे. यंदा नाटय महोत्सव नाहाटा महाविद्यालयात होत असून 24 मे रोजी सायंकाळी 6.30 ते 7 यावेळात डॉ. आशुतोेष केळकर यांच्या हार्मोनिअम वादनाचा कार्यक्रमाने महोत्सवाची सुरवात होईल. यानंतर नागपूर येथील नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल. प्रसंगी आगळ्या-वेगळ्या ‘किमया’ या नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. नाटकघर पुणे, या संस्थेतर्फे नाटकाचे (अभिवाचन) सादर होईल. लेखक माधव आचवल आणि दिग्दर्शक आणि सादरकर्ते अतुल पेठे आहेत. दुसर्‍या दिवशी शनिवार, 25 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता स्थानिक कलावंतांचा गायनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी सात वाजता मितीचार कल्याण या संस्थेची निर्मिती असलेले ‘लोकोमोशन’ हे स्वप्नील चव्हाण लिखीत व रवींद्र लाखे दिग्दर्शित दोन अंकी नाटक सादर होईल. तिसर्‍या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता जळगाव येथील भूमी बहुउद्देशीय संस्था निर्मित विनोदी एकांकीका ‘मिस्टर विसरभोळे’ सादर होईल. लेखक वैभव मावळे आहेत. त्यानंतर 7.30 वाजता पार्थ थिएटर, मुंबईनिर्मित पु.ल. देशपांडे यांच्या कादंबरीवर आधारीत मुकेश माचकर लिखित व मंगेश सातपुते दिग्दर्शित ‘मराठी वाड़मयाचा गाळीव इतिहास’ हा धमाल विनोद दीर्घाअंक सादर केला जाणार आहे. दरम्यान, पत्रकार परीषदेला अनिल कोष्टी, धर्मराज देवकर यांची उपस्थिती होती.

36 कलावंत लावणार हजेरी
तिन्ही नाटकांसाठी प्रत्येकी 12 याप्रमाणे 36 कलावंत बाहेरून भुसावळात येणार असल्याचे फालक म्हणाले. दरम्यान, भुसावळ शहरात नाट्यगृहाची निर्मिती करण्यासाठी आपण लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करू व नाट्यगृहाची निर्मिती केली जाईल, असेही त्यांनी सांगत पालिकेला नाट्यगृहासाठी प्रस्ताव दिला जाणार असल्याचे फालक यांनी सांगितले. यंदा 500 प्रेक्षकांची उपस्थिती राहण्याची अपेक्षा व्यक्त करीत नाट्य महोत्सवात कला व नाट्य शास्त्र विभागाचे सुध्दा सहकार्य मिळणार असून कला व नाट्यक्षेत्र कॉलेज स्थापन करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.